Published On : Sun, Jan 13th, 2019

नोकरी देणाऱ्या बना!

Advertisement

कांचन गडकरींचा महिलांना कानमंत्र : महिला उद्योजिका मेळाव्याचा थाटात समारोप

नागपूर : आजच्या धावपळीच्या युगात कुटूंबाचा गाडा हाकताना केवळ पुरूषांनीच नोकरी अथवा व्यवसाय करून भागत नाही. आज नोकरी मिळणे ही कठीण बाब झाली आहे. महिलांना अनेक कौशल्यांची देणगी निसर्गत:च प्राप्त आहे. आपल्यातील हे कौशल्य ओेळखून केवळ नोकरी करून संसाराच्या चाकाला गती देण्याचा विचार बाजूला टाकून आपल्या कौशल्याच्या बळावर उद्योगाची कास धरून इतरांनाही नोकरी देणाऱ्या बना, असा कानमंत्र कांचन गडकरी यांनी दिला.

नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व समाज कल्याण विभागाच्या वतीने शहर समृध्दी उत्सवांतर्गत आयोजित ‘महिला उद्योजिका मेळाव्याचा’ शनिवारी (ता. १२) थाटात समारोप झाला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून कांचन गडकरी बोलत होत्या. मंचावर वैशाली सुधाकर कोहळे, शोभा गिरीश व्यास, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, सरिता कावरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, हनुमान नगर झोन सभापती रूपाली ठाकुर, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, आसी नगर झोन सभापती वंदना चांदेकर, सत्ता पक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका वैशाली नारनवरे, मनिषा अतकरे, स्वाती आखतकर, शितल कांबळे. माजी नगरसेविका निलीमा बावने उपस्थित होते.

पुढे बोलताना कांचन गडकरी म्हणाल्या, कुटूंबाची घडी व्यवस्थित ठेवण्यासाठी महिला सक्षम असणे आवश्यक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत यामागे केवळ त्यांच्यातील कौशल्य व त्या कौशल्याचा महिलांना केलेला योग्य उपयोग हेच कारण आहे. उद्योग व्यवसायातही आज महिला पुढे येत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महिला उद्योजिका मेळाव्या’सारख्या माध्यमातून अनेक महिलांना मागील दहा वर्षापासून स्वयंरोजगाराचा मार्ग सापडला, हे अभिनंदनीय आहे, असेही त्या म्हणाल्या.

आज जग ‘मॉडर्न’ होत असताना आपणही स्वत:सह आपल्या कार्यातून, आपल्या व्यवसायातून ‘मॉडर्न’ होणे आवश्यक आहे. कोणताही उद्योगासाठी गुणवत्ता, पॅकेजिंग आणि वेळेचे व्यवस्थापन या तीन सूत्रांचा योग्य समन्वय आवश्यक आहे. अगदी छोट्या गोष्टींपासून आपणाला उद्योग सुरू करता येऊ शकतो. यासाठी केवळ आपली कल्पकता आणि बाजारातील मागणी यांचा योग्य विचार, अभ्यास करणे गरजेचे आहे. उद्योगात ग्राहकांची विश्वासार्हता मिळविणे अत्यावश्यक आहे. एकदा कमविलेली विश्वासार्हता ग्राहकांना आपल्याकडे खेचून आणते. स्त्री ही खंबीर मनाची असते. तिने एकदा जे ठरविले ते करण्यासाठी ती जिद्दीने कार्य करते. हा गुण तिच्यात उपजतच आहे. त्यामुळे आपल्यातील गुणांची योग्य पारख आणि जोपासणा करून तसेच उद्योगासाठी आवश्यक अनेक छोट्या छोट्या बाबींचा अभ्यास करून मनपाने आपल्यासाठी पुढे ‘महिला उद्योजिका मेळावा’ या संधीचा फायदा करून इतरांना नोकरी देण्यासाठी सज्ज व्हा, असा मंत्रही कांचन गडकरी यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला.

तत्पुर्वी महिला सशक्तीकरणाची मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर ‘जागर महिलांच्या जाणीवांचा, सावित्रीच्या लेकीचा’ असा संदेश असलेला ‘बलून’ मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आला.

महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड यांनी प्रास्ताविकातून समितीच्या विविध उपक्रमांसह महिला उद्योजिका मेळाव्याचा आजपर्यंत सारांश सांगितला. संचालन स्मिता खनगई यांनी केले. ‘महिला उद्योजिका मेळाव्या’च्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी आभार मानले.

विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार
महिला उद्योजिका मेळाव्याच्या प्रत्येक दिवशी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या श्रृंखलेत शनिवारी (ता. १२) फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, उद्योजिका प्रतीक्षा पटवारी, गौरी रंगनाथ, सामाजिक समरसता मंचमध्ये मागील २५ वर्षांपासून कार्यरत माया गायकवाड, शारदा सुरेश, शिक्षण क्षेत्रातील महिलांसाठी कार्य करणाऱ्या सुचेता मेश्राम, शोबिज एंटरटेन्मेंटच्या रूही अफजल, स्वत: तयार केलेल्या उत्पादनांची आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्री करून अनेकांना प्रेरणा मिळवून देणाऱ्या सची मलिक, सामाजिक संदेशासह देशभरात ५ हजार किमीची सायकल रॅली करणारा रितेश भोयर, माजी महापौर बैरणबाई यांच्यासह परिसरात लावण्यात आलेल्या उत्कृष्ट स्टॉल धारकांमधून नीती फाऊंडेशन या दिव्यांगांच्या स्टॉलच्या निर्मल घोडेस्वार, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील स्टॉलचे गजानन चोपडे, अथर्व महिला बचत गटाच्या स्टॉलच्या प्रतिभा कोल्हे, रिता भोंडे, कापडी पिशव्यांचे स्टॉल लावून प्लास्टीकसाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या सुजाता मोकलकर यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्टॉलवर उसळली नागपूरकरांची गर्दी
संपूर्ण मेळावा परिसरात हाताने तयार केलेल्या ज्वेलरी, हस्तोद्योगाची उत्पादने यांच्यासह खाण्याचे ३०० स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉवर नागपूरकरांची गर्दी उसळलेली दिसून आली. महिला बचत गट, दिव्यांग महिलांचे बचत गट तसेच स्वयंरोजगारातून सक्षमीकरणाची कास धरलेल्या उद्योजिकांचेही विविध स्टॉल यावेळी लावण्यात आले होते. विशेष म्हणजे मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता.१२) सकाळपासूनच प्रत्येक स्टॉलवर व परिसरात नागपूरकरांची कुटूंबासह गर्दी होती. महापौर नंदा जिचकार, विविध झोनच्या सभापती, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी स्टालला भेट दिली. संपूर्ण मेळावा परिसरात मतदार नोंदणी जनजागृतीसाठी २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजित लोकशाही पंधरवाडा संदर्भात फलकाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

मराठमोळ्या लावणीने समारोप
६ जानेवारीपासून सुरू झालेल्या महिला उद्योजिका मेळाव्याच्या निमित्ताने दिवसभर महिलांसाठी विविध स्पर्धा, कार्यशाळा घेण्यात आल्या. तर रात्री संगीत रजनीच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली होती. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांच्या धमाकेदार कार्यक्रमाच्या मेजवानीनंतर शेवटच्या दिवशी शनिवारी नागपूरकर प्रेक्षकांसाठी मराठमोळ्या लावणीचे आयोजन करण्यात आले होते. बहारदार मराठमोळ्या लावण्यांच्या तालावर उपस्थित प्रेक्षकांनी चांगलाच ताल धरला. मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या लावण्यांनी उपस्थित अबाल वृद्धांना चांगलेच थिरकायला लावले.