Published On : Thu, Mar 30th, 2017

नागनदी व नाल्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करा- महापौर

Advertisement

नागपूर: पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, नदी व नाल्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरु नये, नागरिकांची कोणत्याही स्वरुपाची जीवित वा वित्तीय हानी होऊ नये यासाठी नागनदी व नाल्यांच्या सफाईचे काम पावसाळ्यापूर्वीच किंबहुना येत्या १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापौर नंदाताई जिचकार यांनी दिलेत.

पावसाळ्यापूर्वी नद्यांचे रुंदीकरण व खोलीकरणाचे कार्य, स्वच्छता अभियानाबाबत मागील वर्षी झालेले काम आणि येणाऱ्या पावसाळ्यातील नियोजित कार्य यासंबधी विस्तृत आढावा महापौर नंदाताई जिचकार यांनी घेतला व आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक नरेंद्र (बाल्या)बोरकर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अप्पर आयुक्त डॉ.रामनाथ सोनवणे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्यअभियंता उल्हास देबडवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी(दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, सहायक आयुक्त महेश मोरोणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मागील वर्षी ७ मे ते २० जून दरम्यान राबविण्यात आलेल्या नदी व नाले स्वच्छता अभियानात नाग नदी, पिवळी नदी व पोरा नदीमधून काढण्यात आलेल्या गाळ, अभियानामध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून सहभागी झालेले प्रेस व मीडिया एडिटर्स, बिल्डर व आर्किटेक्ट, हॉटेल मालक, कॅटरर्स, क्रेडाई संस्था, जाहिरातदार, इंडस्ट्रीयल व ट्रेडर्स इत्यादींचा लाभलेला सहभाग तसेच शासकीय कार्यालये पोलिस खाते,जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो, आर.टी.ओ कार्यालय, एम.ए.डी.सी, एम.एस. ई. डी. सी.एल,महाजनको, निरी, व्हीएनआयटी, नागपूर विद्यापीठ, एनटीपीआई, ओसीडब्ल्यू, ऑईल कंपनी, डब्यल्यूसीएल, मॉईल इत्यादी विविध कार्यालयांच्या सहकार्यातून ही मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात आल्याची सविस्तर माहिती नदी व सरोवर प्रकल्प प्रमुख व उपअभियंता मोहम्मद इजराईल यांनी सादर केली. मागील वर्षी तिन्ही नद्यांमधून १.७१ लक्ष् मेट्रिक टन गाळ काढण्यात आला. २० पोकलेन व जेसीबीच्या एकूण ४५०० ट्रिप्स नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप जे ३८ लाख रुपये प्रलंबित आहे, त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. यावेळी तिन्ही नद्यांच्या स्वच्छताअभियानासोबतच शहरातील एकूण २३७ लहान मोठ्या नाल्यांची सफाईचे कार्य यावर्षीदेखिल सुरू ठेवण्याची सूचना महापौरांनी केली. ‘सांसद जल व पर्यावरण रक्षण योजनांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी महापौर किंवा सत्ता पक्षनेते यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्याची सूचना देऊन प्रशासकीय अधिकारी यांच्या अधिनस्त समन्वय नियंत्रण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या वर्षीदेखिल या उपक्रमात लोकसहभाग वाढविण्याकरिता वर उल्लेखित सर्व खासगी व शासकीय कार्यालयांशी व संस्थांशी संपर्क साधून बैठक आयोजित करण्याची सूचना सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी केली. मनपाच्या स्वास्थ विभागातून जे चांगले समन्वयन करणारे अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले त्यांना या अभियानात सहभागी करुन घेण्याची सूचना माजी महापौर प्रवीण दटके यांनी केली. प्रेस, मिडीया व विविध सामाजिक संस्था यांच्याद्वारे नद्यांचे उपभाग करण्याकरिता विनंती केली जाईल व त्याद्वारे जनजागृतीपर मोहीम राबविली जाईल असे संदीप जोशी यांनी सांगितले. सध्या सीमेंट रोडचे काम युद्धस्तरावर सुरू आहे, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे लाईन चोक झाल्याची तक्रार आहे. या तक्रारींचा तुरंत निवाडा करण्याचे निर्देश महापौरांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.