Published On : Thu, Mar 30th, 2017

स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज- महापौर

Advertisement

नागपूर: उपराजधानीवर पुन्हा एकदा स्वाईन-फ्लूचे सावट आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपुरात पहिला स्वाइन-फ्लूचा रुग्ण आढळून आला. ७ मार्च रोजी स्वाइन-फ्लू बाधित एक महिलेचा मृत्यू झाला. सध्या स्वाइन फ्लू संशयित रुग्णांची संख्या १३ आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर नंदाताई जिचकार यांनी स्वाइन-फ्लूबाबत प्रशासकीय स्तरावरील प्रतिबंधात्मक उपायांचा आढावा बुधवारी मनपा मुख्यालयात घेतला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय( मेडीकल) व महापालिकेच्या रुग्णालयात आवश्यकतेनुसार स्वाईन फ्लूवरील औषध ‘टॅमी फ्लू’ चा साठा पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अनिल चिव्हाणे यांनी दिली. स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश याप्रसंगी महापौर जिचकार यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अप्पर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे तसेच आरोग्य विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वाईन फ्लूचे विषाणू उष्ण वातावरणात सहसा तग धरत नाही तरीही या विषाणूचे ‘म्युटेशन’ झाल्याने उन्हाळ्यातही गेल्या काही वर्षांमध्ये स्वाईन-फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरात १४ महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा या आजाराचे सावट पसरत असल्याने वैद्यकीय क्षोत्रात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिबंधक उपाययोजनेविषयी जाणून घ्या

स्वाईन फ्लू आजार काय आहे?
– हा एच१एन१ विषाणुमुळे होणारा आजार आहे.
– याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो

लक्षणे
– ताप, घसादुखी, घशाला खवखव
– खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी

कोणाला होण्याची शक्यता
– पाच वर्षाखालील मुले, विशेष करुन एका वर्षाखालील बालके
– ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरिक
– उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगी
– गरोदर माता
– मधुमेही
– फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार असणारे व्यक्ती
– चेतनासंस्थेचे विकास असणारे व्यक्ती
– दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती

स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हे करा…
– वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा
– पौष्टिक आहार घ्या
– लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात वापर करा
– पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या
– धुम्रपान टाळा
– भरपूर पाणी प्या
– शिंकताना व खोकताना नाकातोंडावर रुमाल किवा टिश्यू पेपर ठेवा
– टिश्यू पेपरची कचराकुंडीत व्यवस्थित विल्हेवाट लावा. ते इतरत्र टाकू नका.

स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हे करु नका…
– हस्तांदोलन
– सार्वजनिक ठिकाणी थूंकू नका
– डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका
– आपल्याला फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.

जर आपल्या परिसरातील कुटुंबात वरील लक्षणे आढळली किंवा रोगग्रस्त भागातून दहा दिवसाच्या कालावधीत प्रवास करुन आलेली व्यक्ती यांनी तातडीने आरोग्य विभागात संपर्क करुन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
– गरोदर मातांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत घेण्याकरिता स्वाईन-फ्लूची लस डागा रुग्णालयात उपलब्ध आहे.