Published On : Wed, May 31st, 2017

वृक्ष लागवडीचा महाराष्ट्र पॅटर्न तयार करा – सुधीर मुनगंटीवार

Min. Mungantiwar--4 Crore Tree Plantation Prog. Meets-1
मुंबई:
वन विभागाने गतवर्षी लोकसहभागातून राज्यात २ कोटी ८२ लाख झाडे लावली. यावर्षी दि. १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत आपण सर्वांनी मिळून ४ कोटी झाडे लावायची आणि जगवायची आहेत. येत्या तीन वर्षात राज्यात ५० कोटी वृक्ष आपल्याला लावायचे असून देशात वृक्ष लागवडीचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ तयार करायचा आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आज सह्याद्री अतिथीगृहात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील वृक्ष लागवडीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस गृहनिर्माण मंत्री तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता, अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नवी मुंबई येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वन विभागाचे अधिकारी यांच्यासह वन विभागाचे सचिव विकास खारगे, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वृक्षलागवड हा इव्हेंट नाही, हे मिशनमोड स्वरूपात करावयाचे काम आहे असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, दुसरी व्यक्ती काय करते हे पाहण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्यापुरता प्राणवायू देणारा वृक्ष लावावा कारण आपल्याला वृक्ष तोडणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणाऱ्या हातांची संख्या वाढवायची आहे. हे त्यासाठी निर्माण केलेले एक सशक्त व्यासपीठ आहे. या माध्यमातून आपल्याला वृक्ष लावून ते जगवायचेच नाहीत तर प्रत्येकाच्या मनात वृक्षरोपणाचे बीजारोपण देखील करायचे आहे.

Advertisement

पूर्वी क्लायमेटचेंज, वातावरणीय बदल, यासारखे शब्द फक्त पुस्तकात असायचे आता ते प्रत्यक्षात पूर, दुष्काळ, गारपीट यासारख्या गोष्टींमधून अनुभवायला येत आहेत असे सांगून श्री मुनगंटीवार म्हणाले की, फॉरेस्ट या शब्दातच जीवन आहे. पण ज्या पृथ्वीने मनुष्याचे पोषण केले तोच मनुष्य आज पृथ्वीचे शोषण करत आहे. आता ही परिस्थिती थांबवून जीवनदायी वसंधुरेचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. वृक्ष लावण्याचे काम सर्वांचे असावे असे सांगून ते पुढे म्हणाले की, गरिबीविरूद्धचा लढा या संकल्पनेवर काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाने आता भौतिक सुखाच्या व्याखेत थोडा बदल करत पर कॅपिटा हॅपिनेसची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भूतान हा देश जगात सर्वात आनंदी देश ठरला आहे कारण तिथे घटना कोणतीही असो तो प्रसंग वृक्ष लावून साजरा केला जातो.

राज्यात आशियातील सर्वात मोठी हरित सेना उभी करण्याचा मानस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयांच्या कामाचा आढावा घेतांना त्यात वृक्ष लागवडीचा विषय प्राधान्यक्रमावर घ्यावा. वनमंत्र्यांनी 1 जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कामाचे उत्तम नियोजन करत व्यापक लोकसहभागातून तो यशस्वी करावा, असे आवाहन देखील याप्रसंगी केले.

वृक्ष लागवड-रोजगार-उत्पन्न आणि जीवनोन्नती यांची सांगड घालावी-श्री. केसरकर
महाराष्ट्रात वृक्ष लागवडीसाठी सुंदर वातावरण तयार करण्याचे श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाते, असे सांगून वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, वृक्ष लागवडीचे नियोजन हे स्थानिक वातावरणाला पूरक असावे. वृक्ष लागवड आणि उत्पन्न आणि त्यातून जीवनोन्नती याची चांगली सांगड घातली जावी.

वृक्ष लागवड करतांना जंगलातील ग्रास लॅण्ड विस्कळीत होणार नाही याची देखील काळजी घेतली जावी असे सांगून त्यांनी हिरवाई हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे ते जपले जावे असे म्हटले. वन विभागाने स्थानिक प्रजातींच्या गवत लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा असे आवाहन यावेळी केले.

यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, श्रीमती मनिषा चौधरी व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

वृक्ष लागवडीचे सुचक्र सुरु झाले-श्री. खारगे
आपल्या प्रास्ताविकात वन सचिव श्री. खारगे यांनी वृक्ष लागवड ही लोकचळवळ होत असून हे एक सुचक्र सुरु झाल्याचे सांगितले. वृक्ष लागवडीतील ओनरशिप वाढविण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात वृक्ष लागवडीच्या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी सांगितली. राज्यात मोठ्याप्रमाणात रोपे उपलब्ध असून रोप मागण्यासाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने परत जावे लागणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वृक्ष लागवडीसाठी कोकण विभाग सज्ज
कोकण महसूल विभागांतर्गत येत्या १ जुलै ते ७ जुलै २०१७ दरम्यान ४१.५१ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत २७.०२ लाख वृक्ष खड्डे खोदून झाले आहेत तर उर्वरित खड्डे खोदण्याचे काम सुरु आहे. शासकीय व इतर रोपवाटिकांमध्ये सध्या १३४.२९४ लाख रोपे उपलब्ध आहेत. जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील समित्यांच्या सभा, समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही झाल्या आहेत. विभागात ३ लाख ९५ हजार ३५८ लोकांनी हरित सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

जनसामान्यांचा सहभाग मिळवण्यासाठी जनजागृतीचे व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आले असून विभागात ‘रोपे आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर आणि महालक्ष्मी मंदिरात दि. २५ जून २०१७ पासून इच्छुक भाविकांना प्रसाद स्वरूपात रोपे वाटप करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यापैकी कोणत्याही तीन ठिकाणाची निवड करून शहराच्या व्याप्तीनुसार ३ ते ५ ठिकाणी वन विभागाकडून रोपे पुरविण्याकरिता वन महोत्सव केंद्रे देखील उघडण्यात येतील. या केंद्रांमध्ये सवलतीच्या दराने रोपे उपलब्ध होतील, अशी माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली.

बैठकीत तीन वर्षात करावयाच्या ५० कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन, कोकण विभागातील तालुकानिहाय वृक्ष लागवड समन्वय अधिकाऱ्यांची माहिती देणारी पुस्तिका, चला झाडे लावू या ही पुस्तिका तसेच ५० कोटी रोपे सूक्ष्म आराखडा या पुस्तकाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Advertisement