Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 31st, 2017

  पावसाळ्यात सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होऊ नये याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


  मुंबई:
  आगामी पावसाळ्यात सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होवू नये यासाठी मान्सूनपूर्व आराखड्याची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

  मान्सूनपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथी गृह येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंह, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस. मदान, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, जलसंपदा विभागाचे सचिव आर. व्ही. पानसे आदी उपस्थित होते.

  विविध विभागांनी केलेल्या मान्सूनपूर्व तयारी आराखड्यांबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वांचे आराखडे योग्य आहेत. मात्र, या आराखड्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर उत्तमरित्या होईल याकडे लक्ष द्यावे. भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज अचूकपणे वर्तविल्याचे आजपर्यंत दिसून येत आहे. यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. सर्व विभागांनी आगामी पावसाच्या नियमित अंदाजानुसार तातडीच्या उपाययोजनांचे नियोजन करावे. रेल्वे आणि इतर वाहतूक मार्गांचा, दळणवळण यंत्रणेचा प्रभावीपणे उपयोग करावा.

  ते पुढे म्हणाले की, आपत्ती आल्यानंतरच्या मदतीसाठी प्रतिसाद देण्याचा वेळ कमीत कमी कसा होईल याकडे लक्ष द्यावे; जेणेकरून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होणार नाही. पावसाचे पाणी साठून राहू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. गावांचा संपर्क तुटू नये यासाठी संपर्क यंत्रणांचा प्रभावी उपयोग करण्यात यावा. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून येणाऱ्या पावसाळ्यात नियोजनबद्ध आपत्ती व्यवस्थापन करावे, असेही ते म्हणाले.

  येत्या पावसाळ्यात पडणाऱ्या पावसावर अधिक लक्ष द्यावे, असे सांगून मुख्य सचिव सुमित मल्लिक म्हणाले की, यापूर्वी तेलंगणा, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील धरणांत साठणाऱ्या पाण्यामुळे आपल्या राज्यातील नदी काठच्या गावांना धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन पूरव्यवस्थापनासाठी त्या राज्यातील सिंचन विभागाशी सतत संपर्कात रहावे.

  ते पुढे म्हणाले की, जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करुन धोकादायक पुलांवरील वाहतूक बंद करावी. संपर्क यंत्रणा अद्ययावत ठेवावी. तातडीच्या प्रसंगी संपर्कासाठी वायरलेस, व्हीएचएफ आदी साधनांचा वापर करावा. आपत्ती ही कुठल्याही वेळी आणि कधीही उद्भवू शकते ही बाब नेहमीच लक्षात घ्यावी. कुठलीही मोठी आपत्ती उद्भवल्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद बल (एसडीआरएफ) च्या संपर्कात राहून आपत्ती व्यवस्थापन करावे.

  बैठकीत आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक राजीव निवदकर यांच्यासह भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी), सैन्यदल, नाविक दल, हवाई दल, भारतीय सागरी सुरक्षा दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, सर्व विभागीय आयुक्त तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकांच्या आयुक्तांनी मान्सूनपूर्व आराखड्याचे सादरीकरण केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145