Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Oct 5th, 2020

  सर्व सफाई कर्मचा-यांची कोव्हिड तपासणी करा

  महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा

  नागपूर,: शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी सफाई कर्मचारी नियमित कार्य करीत आहेत. आजच्या कोव्हिडच्या काळात सफाई कर्मचारी अहोरात्र सेवाकार्य बजावत आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी कार्य करणा-या सर्व सफाई कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही मनपाची जबाबदारी आहे. कोव्हिडच्या संसर्गापासून बचाव व्हावा, तो झाल्यास तातडीने उपचार मिळावे यासाठी झोनस्तरावर सर्व सफाई कर्मचा-यांची कोव्हिड चाचणी करण्यात यावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

  सफाई कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न व कोव्हिड-१९मध्ये कार्यरत सफाई कर्मचा-यांचे प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी (ता.५) आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य विभागाचे राजेश लवारे, किशोर मोटघरे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयसिंग कछवाह, नागपूर महानगरपालिका शाखा अध्यक्ष प्रदीप महतो, मोती जनवारे आदी उपस्थित होते.

  नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘आपली बस’मध्ये फिरते कोव्हिड चाचणी केंद्र तयार करण्यात आले आहेत. या चाचणी केंद्रांद्वारे प्रत्येक झोनमधील सर्व सफाई कर्मचा-यांची चाचणी करण्यात यावी. चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळणारे व जोखमीच्या रुग्णांवर मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेश हॉस्पिटल आणि आयुष रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येईल. मनपाच्या या तिनही रुग्णालयांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचा-यांकरिता राखीव बेड्स ठेवण्यात आले आहेत, असेही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले.

  प्रारंभी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार यांनी संपूर्ण विषयांवर सविस्तर माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने प्रमुख मागण्यांची महापौरांना सूची सादर करण्यात आली. कोव्हिडमध्ये कार्य करीत असताना मृत्यूमुखी पडलेल्या बाधितांना ५० लाख विमा योजनेचा लाभ आणि परिवारातील सदस्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, कर्मचा-यांच्या पगारातून कपात जीपीएफ रक्कम व त्यावरील व्याज २० दिवसाच्या आत संबंधिताच्या बँक खात्यात जमा करून वार्षिक हिशोब पावतीचे वाटव करणे, शासनाच्या धोरणाप्रमाणे कोव्हिडमध्ये कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवणे, कोव्हिड बाधितांचे अंत्यविधी कार्य करणा-यांना मोबदला देणे, ‘श्रम साफल्य’ योजने अंतर्गत कामगारांना घर बांधून देणे, शिल्लक ऐवजदार सफाई कामगारांना नियमीत करणे, सफाई कर्मचा-यांची क्वॉर्टर रजिस्ट्री करणे आदी मागण्या यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.

  यासर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ सोडविता येणारे प्रश्न मार्गी लावले. २२०६ ऐवजदार सफाई कामगार नियमीत करण्यात आले असून उर्वरित ३५० ऐवजदार सफाई कामगार तसेच शिल्लक सर्व ऐवजदार सफाई कामगारांना नियमित करण्याचा विषय तत्कालिन मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे यासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे यावेळी महापौरांनी सांगितले.

  याशिवाय कोव्हिड बाधितांचे अंत्यविधी कार्य करणा-या सफाई कर्मचा-यांना आता १ हजार रुपये मोबदला देण्यात येणार आहे. सफाई कर्मचा-यांच्या क्वॉर्टर रजिस्ट्री संदर्भात पुढील आठवड्यात स्थावर विभागाची बैठक बोलावण्याचेही निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145