Published On : Mon, Oct 5th, 2020

कोरोना बाधीत मनपा शिक्षकांसाठी बेड आरक्षीत ठेवा : महापौर

शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात घेतला आढावा

नागपूर : कोव्हिड काळात सेवा बजावणा-या शिक्षकांना भेडसावणा-या समस्या व त्याबाबत येणा-या तक्रारींची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी (ता.५) मनपा शिक्षक संघाच्या समस्यांचा आढावा घेतला.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत शिक्षक आमदार नागो गाणार, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, माध्यमिक शिक्षक संघाचे प्रमोद रेवतकर, मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे, प्रमुख सचिव देवराव मांडवकर, कोषाध्यक्ष मलविंदरकौर लांबा आदी उपस्थित होते.

यावेळी शिक्षक संघाद्वारे शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांची सूची सादर करण्यात आली. झोनमध्ये कार्यरत शिक्षकांसोबत असभ्यतेची भाषा थांबविणे, शिक्षकांना कोव्हिड-१९च्या सेवेतून कार्यमुक्त करून साप्ताहिक रजा द्यावी, वाहतूक तसेच प्रोत्साहन भत्ता विनाविलंब देणे, सुरक्षा साहित्य उपलब्ध करणे, शिक्षकांना रात्रपाळीत काम न देणे, शिक्षकांना ५० लाखाचे विमा कवच देणे, ५५ वर्षावरील व विविध आजारांनी ग्रस्त शिक्षकांना कोव्हिड कार्यातून सूट देणे, ऑक्सिमीटरद्वारे तपासणीसाठी वैद्यकीय चमू नियुक्त करणे, कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आल्यास शिक्षकांना गृहविलगीकरणात ठेवणे, मनपा शिक्षकांकरिता स्वतंत्र कोव्हिड रुग्णालयाची व्यवस्था करणे, कोव्हिड व ऑनलाईन शिक्षण अशा दोन्ही जबाबदा-या न ठेवता एका जबाबदारीतून मुक्त करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

शिक्षकांच्या समस्या आणि त्यावरील प्रशासनिक भूमिका यांची माहिती महापौर संदीप जोशी यांनी जाणून घेतली. कोव्हिड-१९ अंतर्गत कार्य करणा-या शिक्षकांना त्यांच्या कार्याला अनुसरून आवश्यक ती सर्व सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी यावेळी निर्देश दिले. ५५ वर्षावरील आणि अस्थमा, मधुमेह, रक्तदाब यासह दिव्यांग, अपघातग्रस्त व विविध आजारांनी ग्रस्त शिक्षकांना सरसकट कोव्हिडच्या कार्यातून मुक्त करणे शक्य नाही. आजच्या कोव्हिडच्या काळात कर्मचा-यांची गरज लक्षात घेता उपरोक्त शिक्षकांना बाहेरील काम न देता त्यांना झोनस्तरावर कार्यालयीन कामेच देण्यात यावी. याशिवाय ऑक्सिमीटरद्वारे तपासणीसाठी वैद्यकीय चमू नियुक्त करणे शक्य नसल्याचेही प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुढील पर्याय निघेपर्यंत शिक्षकांनी संपूर्ण सुरक्षेसह कार्य करावे. शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झाल्यास बाधिताची काळजी घेण्यासाठी कुणी नसल्यास संबंधित शिक्षकांना सात दिवसाची रजा देण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. कोव्हिड-१९ व ऑनलाईन शिक्षण अशा दोन्ही जबबादा-या असणा-या शिक्षकांना एका जबाबदारीतून मुक्त करण्याच्या मागणीसंदर्भात ३ दिवसात आवश्यक माहिती सादर करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले.

मनपा कर्मचा-यांसाठी राखीव बेड्स
मनपा शिक्षक व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास त्यांच्याकरिता शहरात स्वतंत्र रुग्णालय आरक्षित करून विनामूल्य उपचार करण्याच्या शिक्षक संघाच्या मागणीची महापौर संदीप जोशी यांनी दखल घेतली. मनपातील शिक्षक आणि इतर कर्मचा-यांसाठी मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटल आणि आयुष रुग्णालयात राखीब बेड्स ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सातव्या वेतन आयोगासंदर्भात समिती गठीत
मनपा ठरावानुसार मनपा शिक्षक कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणे आणि शालार्थ प्रणालीत समाविष्ठ शिक्षक आणि कर्मचा-यांचे सहाव्या वेतन आयोगाचे थकबाकी बिल १८ महिन्यांपासून प्रलंबित असून यासंबंधी पुढील कार्यवाही करण्याच्या मागणी संदर्भात महापौरांनी शिक्षण समिती सभापतींच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली. समितीमध्ये शिक्षण समिती सभापती, उपसभापती व अतिरिक्त आयुक्तांचा समावेश आहे. सदर समितीने संपूर्ण विषयासंदर्भातील अभ्यास करून ७ दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.