मुंबई : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच देशाच्या राजकारणातही हलचालींना वेग आला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक केंद्र सरकारला ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ट्रम्प यांच्या कथित मध्यस्थीच्या मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक भाकित वर्तवले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, सध्याच्या देशातील परिस्थिती पाहता काहीही होऊ शकतं. राष्ट्रपतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट महत्त्वाची आहे. ते राष्ट्रपतींना भेटायला जातात, पण राष्ट्रपतींनी त्यांना बोलावलेलं नव्हतं, हे लक्षात घेतलं पाहिजे.
RSS च्या बैठकीत होणार मोठ्या निर्णयांची शक्यता-
राऊत पुढे म्हणाले, सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत भविष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा होईल, अशी माहिती आहे. सातत्याने सांगितले जात आहे की सप्टेंबरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात आणि आम्हालाही तसेच वाटते.
नेहरू आणि गडकरी यांचा उल्लेख करत केंद्रावर टीका-
संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक करताना म्हटले की, सध्याच्या सरकारमध्ये सर्वात समजूतदार मंत्री नितीन गडकरी आहेत. त्यांच्या समजदारीला सलाम आहे. पण नेहरूंचे नाव घेतल्यामुळे त्यांच्या विरोधातही काही कारवाई होईल का, अशी भीती वाटते. नेहरूंचा इतका द्वेष का?
मुंबईतील मेट्रो स्थानकाला ‘सायन्स सेंटर’ असं नाव देण्यात आलं, पण पंडित नेहरूंचं नाव मुद्दाम वगळलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हटले नाही, तर ‘राष्ट्रीय उद्यान’ असं नाव ठेवण्यात आलं. ही केवळ नावं हटवण्याची राजकारणाची पातळी आहे,अशी जोरदार टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण-
राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. सप्टेंबरमध्ये नेमकं काय घडणार? केंद्र सरकारच्या हालचाली, RSS ची बैठक आणि विरोधकांची रणनीती — या सगळ्यांकडे आता देशाचं लक्ष लागून राहिले आहे.