मुंबई : राज्यातील शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) संदर्भात ठाण्यात प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने २८ जून रोजी होणारी परीक्षा तातडीने स्थगित करण्यात आली आहे.
देशभरात ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातही पुन्हा एकदा परीक्षा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ठाण्यातून प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाल्यानंतर प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
या परीक्षेसाठी राज्यभरातील मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले होते. अनेकांनी परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र, ऐनवेळी परीक्षा स्थगित झाल्याने उमेदवारांमध्ये संताप आणि निराशेचे वातावरण आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रश्नपत्रिका नेमकी कशी बाहेर आली याचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत. परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, नवीन वेळापत्रकाची प्रतीक्षा उमेदवारांना लागली आहे.





