नागपूर -कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोठ्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात फिर्यादी सैय्यद फरहान सय्यद फिरोज (वय ३०, रा. भोसा रोड, यवतमाळ, सध्या रहिवासी नेताजी नगर, कळमणा, नागपूर) हे टी.एम.टी. लोखंडाचे व्यापारी असून, त्यांनी कळमणा मार्केट रोडवरील रियाज लॉन समोर आरोपी मुर्तुजा युसूफ शाकीर (वय ४२) व शिरीन युसूफ शाकीर (वय ६९), रा. फातीमा मंजील, मोमीनपूरा, नागपूर यांच्याशी व्यवसायिक व्यवहार केला होता.
दि. २० मे २०२४ ते २१ डिसेंबर २०२४ दरम्यान आरोपींनी बाजारभावापेक्षा १० ते १५ रुपये प्रति किलोने कमी दराने लोखंड पुरवण्याचे आमिष दाखवले. या अमिषाला बळी पडलेल्या फिर्यादीने सुरुवातीला विश्वासाने व्यवहार केला. सुरुवातीला काही वेळा योग्य माल दिला गेला. मात्र नंतर आरोपींनी रोख रक्कम व आरटीजिएसद्वारे एकूण ४ कोटी ३१ लाख ६६ हजार ७६६ रुपये घेतले, आणि नंतर व्हॉट्सअॅपवर बनावट इनव्हॉइस व लेजर पाठवत माल न देता फसवणूक केली.
या प्रकरणी सखोल चौकशी करून पोलिस उपनिरीक्षक माने यांनी भादंवि कलम ३१८(४), ३१६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ६०(बी), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आरोपी क्रमांक १ यास अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.