नागपूर : शहरात अवैध मादक पदार्थांच्या विरोधात राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेला अजनी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने तीन ड्रग तस्करांना अटक करत त्यांच्या ताब्यातून सुमारे २.८७ लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज व अन्य साहित्य जप्त केले आहे.
अजनी पोलिस ठाण्यात कार्यरत कर्मचारी अतुल टिकले यांना न्यू कैलास नगरमधील आंबेडकर कॉलेजजवळ एक युवक एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अमित ताराचंद लोखंडे या संशयितास एक स्कूटरसह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
अमितच्या चौकशीत लोकेश सुरेश भोडे या इसमाकडून त्याने ही ड्रग्ज खरेदी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत लोकेशला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून ५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक मोबाईल फोन आणि दुचाकी वाहन असा जवळपास ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
लोकेशकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिसरा आरोपी दत्तू उर्फ विशाल अंबादास दाभने यालाही अटक केली. त्याच्याकडून २९.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, दोन मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
तिघांच्या ताब्यातून एकूण ३७ ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन्स, दुचाकी आणि अन्य वस्तू असा एकूण २,८७,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिनचंद्र राजकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहभाग घेतला. त्यांनी सांगितले की, “ऑपरेशन थंडर” अंतर्गत शहरातील ड्रग माफियांवर लक्ष ठेवण्यात येत असून, भविष्यात अशी आणखी कडक कारवाई केली जाणार आहे.