नागपूर : नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरात शुक्रवारी सकाळी बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. एमएचएडीए कॉलनीतील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी टॉवर क्रेन अचानक कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास गीतांजली मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. कॉटन मार्केट चौकातील एमएचएडीए कॉलनीत बांधकामाचे काम सुरू असताना अचानक टॉवर क्रेन कोसळली. क्रेन कोसळताच घटनास्थळी एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत दोन मजुरांना जीव गमवावा लागल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आल्याचे समजते. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, मृत मजुरांची ओळख काय आणि बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळांवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




