नागपूर : शहरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा काळाबाजार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यशोधरा नगर परिसरात पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने मध्यरात्री छापा टाकून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल ९ लाख ३७ हजार ९५१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी फईम अंसारी आणि त्याचा भाऊ नदीम उर्फ लखन अंसारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ ऑक्टोबरच्या रात्री यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहबूबपुरा परिसरातील टिपू सुलतान चौक आणि नूरी मशिदीजवळ ही कारवाई करण्यात आली. संबंधित परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून त्याची अवैध विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.
यावेळी फईम अंसारी याच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील टिनशेडच्या खोलीत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळला. तसेच त्याचा भाऊ नदीम उर्फ लखन अंसारी याने भाड्याने घेतलेल्या दुसऱ्या खोलीतही तंबाखूजन्य पदार्थ सापडले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून एकूण ९ लाख ३७ हजार ९५१ रुपयांचा माल जप्त केला.
चौकशीदरम्यान फईम याने जप्त केलेला माल त्याचा भाऊ नदीम उर्फ लखन याचा असल्याचे सांगितले. दोघे भाऊ मिळून शहरातील विविध पानठेला चालकांना चोरीछुप्या पद्धतीने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी दोन्ही भावांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अवैध व्यवसायाचे जाळे आणखी कुठपर्यंत पसरले आहे, याचा तपास यशोधरा नगर पोलिस करत आहेत.




