Published On : Fri, Oct 16th, 2020

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

नागपूर : देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करुन स्वत:ला कसा समृध्द करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल असा सतत विचार करणारे, विकसित भारताचे स्वप्न पाहण्यासाठी युवकांना सदैव प्रेरणा देणारे, धर्म व विज्ञान यांची योग्य सांगड घालून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन आजच्या प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी मार्गदर्शक ठरेल, अशी भावना महापौर श्री. संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

विज्ञान, तंत्रज्ञान, शैक्षणिक व सामाजिक एवढेच नव्हे तर राजकीय क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे युगपुरुष व “मिसाईल मॅन” भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आज दि १५ ऑक्टोंबर रोजी म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या तैलचित्रास महापौर श्री.संदीप जोशी, स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके व आयुक्त श्री.राधाकृष्णन बी. यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

या प्रसंगी अति आयुक्त श्री.जलज शर्मा, राम जोशी, संजय ‍निपाणे, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, सहा.आयुक्त (सा.प्र.वि.) श्री.महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार, कार्यकारी अभियंता शकील नियाजी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.