Published On : Sat, Dec 29th, 2018

महा मेट्रो: ‘धावणार माझी मेट्रो’ विशवॉल कॅम्पेनला सुरुवात

Advertisement

नितीन गडकरीसह आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

नागपूर: महा मेट्रो नागपूरद्वारे सुरु करण्यात आलेल्या *’धावणार माझी मेट्रो’* विश वॉल कॅम्पेनला नागरिकांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना काल शनिवारी मा. केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी ह्यांनी त्यांच्या भक्ती निवास या निवास स्थानाहून नागपूर मेट्रोला विशवॉलवर लिहून शुभेच्छा दिल्या. नागरिकांकरिता हे नवे वर्ष नवी भेट घेऊन येणार असून महामेट्रो नागपूरला हि नवी भेट देणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दीक्षित ह्यांना या नव्या सुरु होणाऱ्या पर्वासाठी अनेक सदिच्छा व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे आयएएस, आयपीएस, डीसीपी अधिकाऱ्यांनी देखील या कॅम्पेनचे कौतुक केले. आयएएस, आयपीएस, डीसीपी आणि प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत इतर उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी नुकतीच आयोजित करण्यात आलेल्या जॉय राईडमध्ये या सर्व अधिकाऱ्यांनी या *’विश वॉल’* वर नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.

नागपूर मेट्रोत प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. नव्या वर्षात नागरिकांना देखील मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शुभेच्छा देऊ लागले आहे. नागरिकांच्या या शुभेच्छा आठवणीपूर्वक जपण्यासाठी महा मेट्रो नागपूर द्वारा ‘धावणार माझी मेट्रो विश वॉल’ ची संकल्पना राबविली आहे. धावणार माझी मेट्रो या नावाने हॅशटॅग नागपूरकरांमध्ये प्रसिद्धही झाला आहे. नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजवरही नागरिक उत्स्फूर्त शुभेच्छा देत आहेत. नागरिकांचा उत्साह बघता या शुभेच्छा संकलित करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली आहे *http://wishwall.metrorailnagpur.com* या लिंकवर धावणार माझी मेट्रोला शुभेच्छा देता येतात.

झिरो माईल येथील माहिती केंद्र, लिटिल वूड, मेट्रो हाऊस यासह विविध ठिकाणी महा मेट्रो तर्फे ‘विश वॉल’ लावण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर शहरात येणारे कलाकार देखील या माहिती केंद्रात येऊन आपल्या शुभेच्छा विश वॉल’च्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाला देत आहेत. ‘विश वॉल’ कॅम्पेन मध्ये भाषेचे कोणतेही बंधन नाही. नागरिक आपल्या शब्दात मेट्रो प्रकल्पाला शुभेच्छा देत आहेत. यात लहान मुलांसह, तरुणांचा, महिलांचा आणि जेष्ठ नागरिक उत्साहाने सहभाग नोंदवत आहेत.

महा मेट्रो तर्फे राबविण्यात आलेले ‘धावणार माझी मेट्रो’ विश वॉल कॅम्पेन पुढेही सुरु राहणार आहे. आमच्या परिसरात विश वॉल लावा अशी इच्छा नागरिक महा मेट्रोकडे व्यक्त करू लागले आहे. त्यामुळे आता शाळा, महाविद्यालय, खाजगी संस्था अश्या विविध ठिकाणी विश वॉल लावण्याचा निर्णय महा मेट्रोने घेतला आहे.