Published On : Tue, Jan 7th, 2020

महिलांच्या सुरक्षेला सर्वतोपरी प्राधान्य

Advertisement

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे प्रतिपादन
क्रांतीज्योती सावित्री फुले जयंतीदिनी पोलिसांचा सत्कार

नागपूर: शहर पोलीस महिला, तरुणींची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे. येत्या वर्षात आपण महिला सुरक्षेला, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांत ह्रदयविकाराचे वाढते आजार बघता, यापुढे कर्मचाऱ्यांच्या नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य देऊ, असा संकल्प पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बोलून दाखविला.

श्री स्वामी समर्थ बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ‘उडान एक नयी सोच सॅल्यूट नागपूर पोलिस’ या कार्यक्रम प्रसंगी सत्कारा दरम्यान ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी लीलाताई चितळे, पोलिस उपायुक्त निर्मला देवी, विनिता शाहू आणि संस्थेच्या अध्यक्षा नूतन रेवतकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. 

पोलिस आयुक्त डॉ उपाध्याय पुढे म्हणाले की, कोणत्याही नागरिकांला वाटते की पोलिस घरी येऊ नये. मात्र, नागपुरात ही संकल्पना आज पूर्णतः बदलली आहे. महिला व तरुणींच्या अत्याचाराच्या घटनेला लगाम कसण्यासाठी ‘होम ड्रॉप’ सारखे सुरक्षेवर भर देणारे उपक्रम राबविल्या जात आहेत. या उपक्रमाला शहरात महिलांडून चांगला प्रतिसाद मिळत असून देशभरात स्तुती होत आहे. उपक्रमाअंतर्गत महिला व तरुणींचे पोलिसांना रात्रीच्या सुमारास फोन आल्यास कर्मचारी त्वरित मदतीला धावून जातात. त्यांना सुरक्षित घरी सोडण्यात येते. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. ही ‘होम ड्रॉप’ची संकल्पना नूतन रेवतकर यांची मुलगी पूनम रेवतकर यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीतून मिळाली. एवढेच नव्हे तर पोलिस भरोसा सेलच्या माध्यमातून ही महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात हाताळत आहे. त्यामुळे आधी लोकांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे आहे शब्दाची जादू ज्याला कळली तो जग जिंकला व ज्याला नाही कळली तो हरला. शब्दात नम्रता असायला पाहीजे कारण 70 % गुन्हे रागाच्या भरात होतात . त्यामुळे वाद कुठलाही असो शब्दाच्या जादुई शक्तिने भडकलेला जमाव देखील शांत होते. त्यामुळे प्रत्येकाशी नम्रतेने वागण्याचा सल्ला डॉ. उपाध्याय यांनी पोलिसांना दिला. संस्थेने प्रथमच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार घडवून आणला. यात ‘पीआय टू सीपी’ अशी सत्काराची संकल्पना होती. पोलिस आयुक्त डॉ. उपाध्याय यांचा सत्कार लीलाताई चितळे यांनी केला. पाचही झोनचे पोलिस उपायुक्त अनुक्रमे निर्मला देवी, विनीता शाहू, विवेक मसाळ, निलोत्पल, राहुल माकणीकर, वाहतूक विभागाचे चिन्मय पंडित, विक्रम साळी यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त आणि शहरातल्या पोलिस ठाण्यातील उपस्थित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ३३ पैकी ३० पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते.संचालन आरजे मोना यांनी केले. प्रास्ताविक नूतन रेवतकर यांनी केले. चिमुकल्या डिम्पल सिंग या मुलीने दिल्लीतील निर्भया प्रकरणावर “नारी” ही कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.