मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या मोठ्या महापालिकांवर लक्ष केंद्रीत झाले आहे. विधानसभेतील विजयामुळे उभारी मिळालेल्या महायुतीने आता महापालिकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्धार केला आहे. मात्र मुंबई महापालिकेतील परिस्थिती वेगळी असल्यामुळे महायुतीने येथे सामूहिक लढतीचा पर्याय स्वीकारण्याचा विचार सुरू केला आहे.
राज्यात नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असून, मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. याच मुंबईत उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर मराठी मतांची मोठी एकजूट त्यांच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या या संभाव्य एकीमुळे महायुतीत खळबळ उडाली असून, त्याचा मुकाबला करण्यासाठी मुंबईत एकजुटीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जात आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, राज-उद्धव एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड अधिक बळकट होईल अशी भीती महायुतीला वाटते. त्यामुळे ‘ठाकरे जोडी’ला टक्कर देण्यासाठी भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्रितपणे मैदानात उतरणार आहेत. मात्र इतर महापालिकांमध्ये मात्र युती होण्याची शक्यता अत्यल्प आहे.
पुणे, ठाणे, नाशिकमध्ये भाजप स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. या शहरांमध्ये स्थानिक असंतोष, अंतर्गत बंडखोरी, तसेच जागा वाटपातील तिढा लक्षात घेता महायुती ऐवजी वेगवेगळ्या लढतीचं चित्र दिसू शकतं. मात्र मुंबईत मात्र कोणतीही जोखीम न पत्करता, महायुतीसाठी संयुक्त लढाई आवश्यक असल्याचं रणनीतीकारांचं मत आहे.
दरम्यान, निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. इच्छुकांची गर्दी, अंतर्गत कुरबुरी आणि स्थानिक समीकरणं पाहता महायुतीने ‘मुंबई फोकस्ड स्ट्रॅटेजी’वर भर दिला असून, गरज पडल्यास ‘प्लॅन बी’ही तयार ठेवण्यात येत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे निवडणूक समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. त्यामुळेच महायुतीची ही ‘मुंबई सेंटरड योजना’ पुढील महिन्यांत राज्याच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकते.