मुंबई– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते – जालना येथील माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि परभणीचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर – हे मंगळवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.
राजकीय घडामोडींना वेग-
गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांचा ओघ सुरू आहे. विशेषतः काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या लक्षणीय असून, या प्रक्रियेला रवींद्र चव्हाण यांचे नेतृत्व लाभत आहे. आता गोरंट्याल आणि वरपूडकर या नेत्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार आहे.
जालना-परभणीच्या राजकारणात उलथापालथ?
कैलास गोरंट्याल हे तीन वेळा जालना मतदारसंघातून आमदार राहिले आहेत आणि स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. तसेच, सुरेश वरपूडकर हेही परभणी जिल्ह्यातील एक अनुभवी आणि मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. या दोघांनी भाजपकडे वळल्याने नुसते जालनाच नव्हे, तर नांदेड आणि परभणीसारख्या जिल्ह्यांतील राजकीय समीकरणंही बदलण्याची शक्यता आहे.
काँग्रेससाठी मोठा सवालचिन्ह-
निवडणुका तोंडावर असताना अशा बड्या नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने पक्षात अस्वस्थता पसरली आहे. ही गळती पुढे आणखी मोठी होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेस आता ही गळती थोपवण्यासाठी कोणते पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचा मराठवाड्यात ‘स्ट्रॅटेजिक स्ट्राइक’-
हा पक्षप्रवेश भाजपसाठी केवळ नेत्यांची भर नव्हे, तर निवडणुकीपूर्वीचा एक नियोजित ‘राजकीय स्ट्रॅटेजिक स्ट्राइक’ मानला जात आहे. त्यामुळे काँग्रेससमोर आता अस्तित्व टिकवण्याचे आणि संघटन मजबूत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.