Published On : Tue, Apr 3rd, 2018

महावितरणची नागपूर परिमंडलात अखंडित वीजपुरवठ्याकडे वाटचाल


नागपूर: भविष्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेता ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणने मागिल दोन वर्षापासून सुनियोजित पद्धतीने वीज वितरण प्रणालीच्या क्षमतावाढीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. राज्याचे ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने नागपूर परिमंडलातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून महावितरणने मागिल दोन वर्षात नागपूर परिमंडलांतर्गत येत असलेल्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तब्बल 17 नवीन उपकेंद्रे कार्यान्वित केली आहेत तर 22 नवीन उपकेंद्रांची कामे पुर्णत्वाकडे आहे.

वीज ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कटीबद्ध असून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात अनेक नवनवीन योजना हाती घेतल्या आहेत, यात नवीन वीज उपकेंद्राची उभारणी करण्यासोबतच विद्यमान उपकेंद्रातील रोहित्राची क्षमतावाढ, उपकेंद्रात नवीन रोहित्राची उभारणी वितरण रोहीत्रांची उभारणी आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे. मागील दोन 2 वर्षात महावितरणकडून मोठ्या प्रमाणात ही कामे पूर्ण करण्यात आली असून सोबतच अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

महावितरणने आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये नागपूर परिमंडलात 11 नवीन उपकेंद्राची तर आर्थिक वर्ष 2016\-17 मध्ये 6 नवीन वीज उपकेंद्राची भर पडली आहे. आगामी काळात यात आणखी 5 नवीन उपकेंद्राची भर पडणार आहे. परिमंडलात मागील 2 वर्षात 17 उपकेंद्र कार्यान्वित झाली असून यामुळे उपकेंद्र रोहित्रांची क्षमता 135 एमव्हीएने वाढली आहे. याच काळात 11 उपकेंद्र रोहित्रांची क्षमता वाढ करण्यात आली असून येत्या काळात 22 ठिकाणच्या उपकेंद्र रोहित्रांची क्षमतावाढ करण्याचे काम नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. यामुळे उपकेंद्र रोहीत्रांची क्षमता 30 एमव्हीएने वाढणार आहे. याचसोबत सध्या कार्यरत असलेल्या एका उपकेंद्रात विद्यमान रोहित्रासोबतच नवीन रोहित्र उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील 2 वर्षाच्या कालावधीत या दोन्ही जिल्ह्यात 8 ठिकाणी अतिरिक्त रोहित्र उभारण्यात आले असून यामुळे यंत्रणेची क्षमता 50 एमव्हीएने वाढली आहे.

उपकेंद्राची उभारणी केल्यावर वीज ग्राहकांना योग्य दाबाने वीज पोहचवण्यासाठी जागोजागी वीज वाहिन्यांसोबच वितरण रोहित्रांची उभारणी करणे आवश्यक असून मागील 2 वर्षाच्या कालावधीत 341 नवीन रोहित्रांची उभारणी करण्यात आली आहे तर आगामी काळात 1718 नवीन वीज रोहित्रांची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करता येणार आहे.


ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नागपूर परिमंडलाला विविध योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असल्याने विकास कामाची गती वाढली आहे. प्रगतीपथावर असलेली नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी स्वत: कामे सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत संबंधितांना आवश्यक त्या सूचना निगर्मित केल्या आहेत.