Published On : Wed, Jun 13th, 2018

अतिउच्चदाब वाहीनीच्या कोसळलेल्या मनो-याची महावितरण प्रादेशिक संचालकांकडून पाहणी

नागपूर: नागपूर जिल्ह्यात 2 जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यातील रिठी-पारडी गावाजवळ अदानी कंपनीच्या 765 केव्ही तिरोडा-तिरंगी या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीचा एक मनोरा पुर्णपणे जमीनदोस्त झाला तर इतर दोन मनो-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा मनोरा कोसळतांना महावितरणच्या वाहीनीवर कोसळल्याने महावितरणची वाहिनीही मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली आहे, झालेल्या या हानीची पाहणी करून वितरण यंत्रणा त्वरीत उभी करण्यासंदर्भात आवश्यक त्या सुचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत.

रिठी-पारडी येथील घटनास्थळी भालचंद्र खंडाईत यांनी नुकतीच भेट देत एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला, यावेळी त्यांच्यासमवेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, अदानीचे उपमहाव्यवस्थापक रामकृष्ण राऊत, वरिष्ठ व्यवस्थापक अमरनाथ आणि ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते.

हा अजस्त्र उच्चदाब मनोरा महावितरणच्या वाहिनीवर कोसळून कृषीपंपासाठीच्या लघुदाब वाहिनीचे तब्बल 20 खांब क्षतीग्रस्त झाल्याने वीज वितरण सुरळीत करण्यात अनेक अडचणी येत आहेत, त्यांचे तात्काळ निराकरण करून वीजपुरवठा त्वरीत सुरु करण्याच्या सुचनाही प्रादेशिक संचालकांनी महावितरण आणि अदानीच्या सर्व संबंधितांना यावेळी दिल्या. ही लघुदाब वीजवाहीनी त्वरीत उभारून कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा पुर्ववत सुरु करण्याचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.