Published On : Sat, Mar 31st, 2018

डी.पी. जवळ कचरा जाळू नका महावितरणचे नागरिकांना आवाहन

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: वीज वाहिन्या, वितरण रोहीत्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, वितरण रोहीत्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघडयावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. सध्या तापमानही दिवसेंदिवस वाढत असल्याने कच–यास आगी लागण्याचे प्रकारही वाढत आहेत.

वीजयंत्रणाही उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच वीजवितरण यंत्रणेजळ्चे तापमान अश्या आगीमुळे वाढल्यास यंत्रणेलाही त्याचा फ़टका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कच–याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. नागपूर शहरातील तसेच जिल्हयातील नागरिकांनी उघडयावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये.


मागिल वर्षी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादासाठी वापरलेल्या पत्रावळीचा कचरा वितरण रोहीत्राजवळ पेटविल्याने वीज्तारा वितळून स्थानिक बालाजीनगर परिसरातील वीजपुरवठा तब्बल दहा तास खंडित होता, यामुळे कडाक्याच्या ऊन्हात परिसरातील नागरिकांना विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागला होता तर 12 मार्च रोजी सदर येथील मंगळवारी बाजार परिसरात रोहीत्राजवळ टाकण्यात आलेल्या कच-याला आग लागून वीजपुरवठा करणारा केबल पेटला यामुळे येथील रहिवाश्यांनाही बराच वेळ वीजेविना राहावे लागले होते, अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास १८००२३३३४३५ किंवा १८००२००३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर माहिती द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.