Published On : Mon, Jun 11th, 2018

पेशवेकालीन पगडी राष्ट्रवादीतून हद्दपार, यापुढे फुले पगडीनेच स्वागत

Advertisement

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले पगडीनेच स्वागत करायचं, असा आदेश दिला.

पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करण्याचा निर्णय घेतला.

पगडीची चर्चा

या कार्यक्रमात शरद पवारांनी छगन भुजबळांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीने सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार यांचे स्वागत पुणेरी पगडीने झाले. त्यानंतर उशिरा मंचावर आलेल्या भुजबळांचे स्वागतही पुणेरी पगडीने झाले.भुजबळांच्या भाषणानंतर जेव्हा शरद पवार भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंच्या पगडीने त्यांचा सत्कार केला. शिवाय राष्ट्रवादीच्या यापुढच्या सभा आणि मेळाव्यांमध्येच याच पगडीचा वापर करण्याचा सल्लाही शरद पवार यांनी आयोजकांना दिला.त्यामुळे शरद पवारांनी या कृतीद्वारे नक्की काय संदेश दिला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. अशा प्रकारचं विधान करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्याचं आमंत्रणच दिलं आहे. काल रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालघरमध्ये विजय झाल्याचा भाजपचा दावा किती पोकळ आहे हे सांगताना पवारांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. नोटाबंदी, सरकारची चार वर्षे, ईव्हीएम बिघाड, महाराष्ट्र सदन अशा अनेक मुद्द्यांवरून पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

पुण्यातल्या शिंदे विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून हजारो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

ज्यांनी माझ्या पडत्या काळात माझ्या कुटुंबियांना आसरा दिला, त्यांना सोडून मी दुसऱ्या पक्षात कसा जाईन? अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या वावड्यांना पूर्णविराम दिला. इतकंच नाही, तर कोणताही घोटाळा झाला नसताना मला डांबण्यात आलं. पण मी निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय शांत राहणार नाही, असा एल्गारही पुकारला. यावेळी छगन भुजबळांना गहिवरुनही आलं. भाषणामध्ये त्यांनी अनेकदा साहिर लुधियानवी यांच्या काव्य रचनांचा वापरही केला.