मुंबई: भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारात संभाजी भिडे गुरुजी यांचा हात असल्याने त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेना या संघटनेच्या कार्यकर्त्याने मंत्रालयाच्या गेटसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. गणेश पवार असे त्या तरुणाचे नाव आहे.या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.
दरम्यान, भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. हिंसाचारात वाहनांची तोडफोड तसेच वाहने पेटवून देण्यात आली होती. दंगल घडवणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिलिंद एकबोटे आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकबोटे यांना अटक झाली होती. त्यांना जामिनही मिळाला आहे. मात्र, संभाजी भिडे गुरुजी यांना अद्याप अटक झालेली नाही. याकरिता संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत गणेश पवार बुधवारी दुपारी मंत्रालयासमोर आला.
त्याने मंत्रालयाच्या गेटजवळ अंगावर केरोसिन ओतून घेतले. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघितला आणि त्यांनी तातडीने गणेश पवारच्या दिशेने धाव घेत त्याला रोखले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. गणेश पवार हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचा रहिवासी आहे. तो रिपब्लिकन सेना या संघटनेचा कार्यकर्ता आहे.

