नागपूर: शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपविलेल्या सायबरटेक कंपनीने ३० जूनपर्यंत खुल्या भूखंडासह सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करावे जेणे करून कर आकारणीमध्ये सुसूत्रता आणता येईल, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा आणि कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील कर विभागातील सभागृहात कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी सदर निर्देश दिलेत. स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा, कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांच्यासह समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, समितीच्या सदस्या यशश्री नंदनवार, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, माधुरी ठाकरे, भावना लोणारे, मंगला लांजेवार, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम बैठकीला उपस्थित होते.
सदर बैठकीत सर्वप्रथम सायबरटेकने केलेल्या कामांचा आढावा सभापतींनी घेतला. बहुतांश वॉर्डामध्ये ६० ते ६५ टक्के मालमत्ता मूल्यांकनाचे काम झाले आहे. उर्वरीत कामांसाठी मूल्यांकन करणाऱ्या चमूंची संख्या वाढविण्यात येत असल्याची माहिती सायबरटेकच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या ४० चमू कार्यरत असून त्या १०० करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावर सदर कार्य ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, सोबत खुल्या भूखंडांचे मूल्यांकनही या वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश दिले. झोन कार्यालयात मालमत्ता करासंदर्भात येणाऱ्या काही तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी सायबरटेकचा एक व्यक्ती प्रत्येक झोन कार्यालयात नेमण्यात यावा. तो झोन सहायक आयुक्त आणि मुख्यालयाशी समन्वय साधेल, असेही निर्देश सभापतींनी दिले.
कर वसुलीसाठी ज्या मालमत्तांच्या लिलावासाठी वारंट काढण्यात आले होते, त्याबाबतचा आढावाही कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी घेतला. लिलावाची प्रक्रिया ही निरंतर सुरू ठेवा, असे निर्देशही त्यांनी दिले. अनादरीत धनादेशासंदर्भात कडक कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. जाधव यांनी दिले.
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात कर वसुलीचे नियोजन आतापासूनच करायचे आहे. प्रत्येक महिन्याचे स्वतंत्र नियोजन करून उद्दिष्ट ठरवा आणि ते गाठा जेणेकरून चालू आर्थिक वर्षात ५०० कोटींचे उद्दिष्ट गाठता येईल, असेही सभापती संदीप जाधव यांनी सांगितले. बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
