Published On : Fri, Apr 27th, 2018

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या धोरणांमुळे व राज्यांवर दाखविलेल्या विश्वासामुळे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून भारत उदयास येत आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात वेगाने आर्थिक प्रगती करणारे राज्य बनले असून सन 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व इंडिया फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित इंडिया इकॉनॉमिक समिट 2018 मधील ‘स्टेट्स ॲज न्यू इंजिन्स ऑफ ग्रोथ’ या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील राज्यांवर विश्वास दाखविल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. गेल्या चार वर्षात प्रधानमंत्री यांनी राबविलेल्या धोरणांमुळे राज्ये ही विकासाची इंजिन झाली आहेत. जास्तीत जास्त गुंतवणूक आणून राज्यांचा विकास साधण्यासाठी देशातील राज्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा वाढली आहे. केंद्र शासन व राज्य शासनामध्ये सहकार्य वाढले असून शासनातील बदलाचे आम्ही साक्षीदार झालो आहोत. गेल्या दहा वर्षांपासून विविध परवाने न मिळाल्यामुळे नवी मुंबई विमानतळाचे काम थांबले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रगती’ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर या विमानतळासाठीचे सात महत्त्वाचे परवाने एका दिवसात मिळाले असून त्याचे कामही सुरू झाले आहे.

महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात वेगाने वाढणारे राज्य असून महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. राज्यात पायाभूत सुविधांचे सर्वात जास्त प्रकल्प सुरू आहेत. जागतिक गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे देशातील 47 टक्के परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून राज्य उदयास आले आहे. राज्यातील कृषी विकासाचा दर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. त्यामुळे कृषी उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर सेवा व औद्योगिक क्षेत्रात वाढीसाठी घेतलेल्या निर्णयामुळे सन 2025 पर्यंत महाराष्ट्र हे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य असेल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.