Published On : Fri, Apr 27th, 2018

देशाच्या प्रगतीसाठी सर्व समाज एकसंध ठेवण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

सोलापूर: भारतावर अनेक आक्रमणे होऊनही प्राचीन परंपरांमुळेच भारताची संस्कृती टिकून आहे. देशातील विविध मठ संस्कार व शिक्षण प्रसार करण्याची ठिकाणे आहेत, देशातील सर्व समाज एकसंघ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

येथील अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरात श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या श्री संकल्पसिद्धी कार्यमहोत्सव २०१८ अंतर्गत वीरशैव लिंगायत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सिद्धराम म्हेत्रे, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, श्री श्री श्री १००८ उज्जयनी जगद्गुरू, श्री श्री श्री १००८ श्रीशैल जगद्गुरू, श्री श्री श्री १००८ काशी जगद्गुरू उपस्थित होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कोणत्याही संकल्पाची पूर्ती ही आपली भारतीय संस्कृती आहे. होटगी मठाच्या शिवाचार्यांनी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भगवतपाद यांची १०८ फूट उंच मूर्तीचे लोकार्पण व १००८ शिवलिंगांची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा संकल्प सोडला होता. हा संकल्प पूर्ण होईपर्यंत केवळ पाण्यावर राहण्याची कडक उपासना त्यांनी केली. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते अडीच वर्ष केवळ पाण्यावर राहिले. त्यांच्या पश्चात त्यांचा संकल्प त्यांच्या शिष्यांनी आणि समाजबांधवांनी पूर्ण केला ही मोठी उपलब्धी आहे.

देशातील मठांना ऐतिहासिक वारसा आहे. या मठातून शिक्षण आणि संस्कार देण्याचे काम चालते. होटगी मठालाही शिक्षण प्रसाराची मोठी परंपरा आहे. प्राचीन परंपरांमुळेच देशाची संस्कृती टिकून आहे. मठांच्या माध्यमातून समाज एकसंध ठेवण्याचे काम चालते. देशाच्या प्रगतीसाठी समाजातील दरी कमी होऊन समाज एकसंध राहण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

श्रद्धा टिकली तरच देशाची अखंडता टिकणार आहे. समाजाला एकसंध ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. लिंगायत समाजाला इतर मागासवर्गीयांच्या सवलती मिळूवन देण्यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘संकल्प सिद्धीला आपल्या संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. गुरुंनी केलेला संकल्प या निमित्ताने सर्व शिष्यांनी व समाजाने सिद्धीला नेला आहे. समाजाच्या उत्थानासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे’.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, बृहन्मठ होटगी मठाला प्राचीन इतिहास आहे. या मठाला आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी या मठाच्या माध्यमातून काम सुरू आहे. योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामींच्या संकल्पाची आज संकल्पपूर्ती होत आहे. शासनाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सुरु आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री श्री श्री १००८ जगद्गुरू पंडिताराध्य भगवतपाद यांच्या १०८ फूट उंच मूर्तीचे लोकार्पण आणि १००८ शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना समारंभ पार पडला. तसेच ‘संकल्पसिध्दी’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी होटगी मठ आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधू-वरांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी आशीर्वाद दिले.

यावेळी माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचे भाषण झाले. या संमेलनाला राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील वीरशैव समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement