कोरडवाहू शेतकर्‍याला वार्‍यावर सोडले : बावनकुळे

नागपूर: शेतकर्‍यांना कर्जमाफीचा ढोल वाजवणार्‍या महाराष्ट्र शासनाने मात्र कोरडवाहू शेतकर्‍यासाठी एकही योजना अंदाजपत्रकात दिली नाही. पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यासाठीच या शासनाने योजना आणल्या. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकर्‍याला मात्र या अंदाजप़त्रकातून वार्‍यावर सोडण्यात आले आहे. हा शेतकरी या योजनांपासून वंचित राहणार आहे.

तसेच पीक कर्जाशिवाय शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एकही योजना या अंदाजपत्रकात नसल्याची टीका माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण, तरुणांना रोजगार, नवीन रोजगार निर्मितीकडे या शासनाने साफ दुर्लक्ष केलेले आहे. तसेच पेट्रोल व डिझेलवर 1 रुपया व्हॅट कर लावून पेट्रोल डिझेल शासनाने महाग केले आहे. त्याचा फटका सामान्य माणसालाच बसणार आहे. महागाई वाढणार आहे. पेट्रोल डिझेल वाढीचा फटका सर्वच क्षेत्राला बसणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

शासनाने सौर कृषी पंपासाठी केलेली तरतूद अत्यंत तोकडी असून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना बांधावर जाऊन मदत करण्याची शासनाची घोषणा हवेतच विरली. अंदाजपत्रकात या मदतीचाही समावेश कुठे दिसत नाही. शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हाच प्रकार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.