Published On : Sat, Oct 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लाडकी बहीण योजनेनंतर एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना; राज्य सरकारकडून माहिती संकलन सुरू

Advertisement

लाडकी बहीण योजनेनंतर एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना; राज्य सरकारकडून माहिती संकलन सुरू

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकार एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकट्याने सांभाळणाऱ्या महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देणे हा या प्रस्तावित योजनेचा उद्देश आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात यासंदर्भात प्राथमिक माहिती दिली.

पतीचे निधन झालेल्या, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच आजीवन अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने सरकारकडून विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या महिला स्वतःच्या उत्पन्नावर मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि कुटुंबाच्या इतर गरजा पूर्ण करतात. त्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी स्वतंत्र योजना आखण्याची तयारी सुरू आहे.

मात्र, या योजनेचे स्वरूप काय असेल, पात्र महिलांना किती आर्थिक मदत मिळेल आणि त्यासाठी कोणत्या अटी लागू असतील, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

राज्यातील एकल महिलांची माहिती गोळा करण्यास सुरुवात-
प्रस्तावित योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकल महिलांची संख्या निश्चित करण्यासाठी माहिती संकलित केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, महाराष्ट्रात १२ लाखांहून अधिक एकल महिला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत तीन लाखांहून अधिक महिलांची नोंद झाल्याचे सांगितले जात आहे. अंतिम आकडेवारी मात्र सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

Advertisement

शाळा-महाविद्यालयांतूनही माहिती संकलन-
एकल महिलांच्या मुलांची परिस्थिती समजून घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली जात आहे. वडील नसलेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. यानंतर तहसील आणि गावपातळीवरही माहिती संकलित केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.या माहितीच्या आधारे राज्यातील एकल महिलांची संख्या, त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती आणि मदतीची गरज यांचा आढावा घेता येणार आहे.

योजनेच्या घोषणेकडे महिलांचे लक्ष-
एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना सुरू झाल्यास कुटुंबाचा आर्थिक भार एकट्याने पेलणाऱ्या महिलांना दिलासा मिळू शकतो. मात्र, योजनेची अधिकृत घोषणा, लाभाची रक्कम, पात्रतेचे निकष आणि अंमलबजावणीची तारीख याबाबत सरकारकडून सविस्तर माहिती येणे बाकी आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेते, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.