Published On : Thu, Jul 13th, 2017

शेतकऱ्यांचे समाधान करुनच समृद्धी महामार्गासाठी जमिनीची खरेदी – एकनाथ शिंदे

•महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी थेट जमीन खरेदीचा शुभारंभ
•शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करतांना मंत्री झाले साक्षीदार
•सहा शेतकऱ्यांकडून महामार्गासाठी जमिनीची खरेदी
•शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
•सहा शेतकऱ्यांकडून 5.59 हे.आर. जमीन खरेदी
•शेतजमिनीचा 2 कोटी 60 लक्ष रुपयाचे मोबदला जमा


नागपूर:
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याच्या कृषी व औद्योगिक विकासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे शासनाने या प्रकल्पाला प्राधान्यक्रम दिला आहे. या प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांचे संपूर्ण समाधान करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समृद्धी महामार्गासाठी थेट जमीन खरेदीचा शुभारंभ आज नागपूर येथून झाला.

Advertisement
Advertisement

हिंगणा तालुक्यातील महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्यात आली. त्याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे बोलत होते. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी सहा शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरानुसार शेत जमिनीची नोंदणी करुन दिली. या जमिनीच्या नोंदणीवर साक्षीदार म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून स्वाक्षरी केली. तसेच समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

Advertisement

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, एमएसएसआरडीसीचे मुख्य अभियंता चॅटर्जी, कार्यकारी अभियंता कळसगावकर उपस्थित होते.

Advertisement

हिंगणा तहसिल कार्यालयातील मुद्रांक शुल्क नोंदणी कार्यालयात नागपूर-मुंबई या द्रुतगतीमार्गासाठी हिंगणा तालुक्यातील 121 शेतकऱ्यांनी थेट जमिनीच्या विक्रीसाठी संमती दिली असून त्यापैकी सहा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची नोंदणी करुन दिली. थेट खरेदी व्यवहारानंतर शासनाने निश्चित केलेला शेतीचा दर लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे.

नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धी मार्ग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणातील दहा जिल्ह्यांना जोडणार असून या महामार्गावरुन 26 तालुके हे विकास मार्गावर येणार असून हा प्रकल्प लवकर सुरु व्हावा यासाठी शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच थेट जमीन खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जमिनीचे दर सुद्धा जाहीर केले असल्याचे सांगताना सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर जिल्ह्यातून या मार्गासाठी जमीन खरेदीचा शुभारंभ होत आहे. शेतकऱ्यांना मोबदल्या संदर्भात असलेल्या शंका तसेच संपूर्ण समाधान करण्यासाठी जिल्हाधिकारी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी या संदर्भात कोणावरही विश्वास न ठेवता महसूल अधिकाऱ्यांकडून समाधान करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


नागपूर-मुंबई या दोन शहरांमधील अंतर केवळ सहा तासात पूर्ण होणार असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, विकास प्रकल्पांसाठी सर्वांनी एकत्र येवून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न असल्यास ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निर्णय घेण्यात येईल. हा प्रकल्प पूर्ण करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी सुद्धा घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सहा शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनींची खरेदी
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या हिंगणा तालुक्याती 279 शेतकऱ्यांच्या जमिनीची आवश्यकता असून थेट खरेदीने जमीन खरेदीसाठी 119 शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहा शेतकऱ्यांची सुमारे 5.59 हे.आर. जमिनीची रजिष्टरी करण्यात आली असून शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार 2 कोटी 60 लक्ष रुपयाचा मोबदला थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आज रजिष्टरी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये किन्ही (रिठी) या गावातील राम आसरे, शाहू या शेतकऱ्यांचा सर्व्हे नं. 7/1 व 2 मधील 0.8 हेक्टर आर. व 0.58 हेक्टर आर. जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीचा मोबदला म्हणून अनुक्रम 34 लाख 26 हजार 738 रुपये व 24 लाख 84 हजार 395 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात थेट जमा करण्यात येत आहे.

बोरगाव रिठी येथील गोपाल भगवानजी मिसाळ व श्रीमती कल्पना गोपाल मिसाळ यांच्या सर्व्हे नं. 4/2, 5 व 6 मधील 0.12 हेक्टर आर., 1.58 हे.आर. व 1.12 हे.आर. जमिनीची खरेदी करण्यात आली. वाडेगाव बक्षी येथील श्रीमती चंद्रा रणवीर गायकवाड यांच्या सर्व्हे नं. 109 मधील 1.39 हे.आर. जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीचा मोबदला 81 लाख 68 हजार 705 रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर म्हणाले की, महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी जमीन थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. जमीन खरेदी केल्या नंतर वीस गुठ्यांच्या आतील जमीन शिल्लक असल्यास अशी जमिनही खरेदी करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविल्यास या संदर्भातही निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमिनी संदर्भात थेट संवाद साधला असून शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी जमीन व त्याबाबत मिळणारा मोबदला याची संपूर्ण माहिती दिली आहे. अत्यंत पारदर्शकपणे संवाद असल्यामुळे 110 शेतकऱ्यांनी जमीनी संदर्भात संमती दिली आहे. आणखी शेतकरी संमती देण्यासाठी पुढे येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, सहजिल्हा निबंधक उघडे तसेच तालुका निबंधक प्रियंका पंत, तहसिलदार तसेच महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी व्यवहारासाठी सहकार्य केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement