विदर्भ मराठवाड्याच्या शेतकर्‍यांना सापत्न वागणूक : बावनकुळे

Advertisement

कृषी पंपाच्या कनेक्शनसाठी 2800 कोटी पश्चिम व अन्य महाराष्ट्राला देणार

नागपूर: जेव्हा जेव्हा या राज्यात बिगर भाजपाचे सरकार सत्तेवर आले, त्यावेळी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांना सापत्न वागणूक मिळाली आहे. यावेळीही काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाआघाडी सरकारने पुन्हा विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करीत कृषी पंपांच्या कनेक्शनसाठी विदर्भ व मराठवाडा वगळून अन्य महाराष्ट्राला 2800 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकताच 18 मे रोजी एक परिपत्रिक जारी केले आहे.

या 2800 कोटीतून 2542 कोटी रुपये एचव्हीडीएस प्रणालीद्वारे वीज कनेक्शन आणि 105 नवीन उपकेंद्रांसाठी 257 कोटी रुपयांच्या कर्जासाठी शासनाने हमी घेतली आहे. हे कर्ज महावितरण घेणार आहे. यापैकी एकही कनेक्शन आणि एकही उपकेंद्र विदर्भ आणि मराठवाड्यात होणार नाही. पुन्हा या भागातील शेतकरी हा उपेक्षित ठेवला जाणार आहे.

सन 2014 नंतर राज्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ऊर्जा क्षेत्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील बॅकलॉग दूर करण्याचा प्रयत्न केला. या सोबतच या दोन्ही क्षेत्रातील उद्योगांनाही सवलत देऊन त्यांनाही स्थिर करण्याचा प्रयत्न केला. ऊर्जा विभागाने आणलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना देण्यात आला. पण राज्यात आता राज्यात आलेल्या बिगर भाजपा सरकारने पुन्हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्‍यांचा अनुशेष वाढविण्याचा प्रकार सुरु केला आहे.आगामी काळात सर्वच विभागांचा विदर्भ व मराठवाड्याचा अनुशेष या शासनाने वाढविलेला असल्याचे चित्र निर्माण होऊ शकते. शासनाची विदर्भातील व मराठवाड्यातील शेतकर्‍यांना देण्यात येत असलेल्या सापत्न वागणुकीचा आपण निषेध करीत आहोत.

विदर्भ मराठवाड्यावर यापूर्वीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शासनाने अन्याय केल्याचे आता नवल राहिले नाही. विदर्भातील अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा अन्याय आपल्या डोळ्यांनी पाहिला पण चक्कार शब्दही काढला नाही, हेही लपून नाही. आता तर काँग्रेसचे ऊर्जामंत्री ही विदर्भातील नागपूरचेच आहेत. पश्चिम आणि उर्वरित महाराष्ट्राला निधी देण्यास विरोध नाही पण विदर्भाच्या शेतकर्‍यावर अन्याय होऊ देऊ नका याकडेही काँग्रेसच्या मंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.