Published On : Sat, Oct 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार; कोकणातील ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, विदर्भातही उष्णतेचा इशारा

Advertisement

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार; कोकणातील ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, विदर्भातही उष्णतेचा इशारा

नागपूर : महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा बदल होत असून, राज्यातील अनेक भागांत उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाच्या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भातही पावसाने उघडीप दिली असून, तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

कोकणात उष्ण आणि दमट हवामान-

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातही तापमानाचा चटका-

Advertisement

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवसही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता-

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागांसह घाटमाथ्यावर हलक्या सरी आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात पावसाची उघडीप; उष्ण व कोरडे हवामान-

विदर्भातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली असून, उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता कमी असल्याने वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.