प्रियंका गांधींच्या वीज बिल माफीच्या सूचना महाराष्ट्र शासनाने स्वीकाराव्या : बावनकुळे

-गरीब मध्यमवर्गीयांचे वीज बिल माफ करावे

नागपूर: ज्येष्ठ कॉंग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात गरीब मध्यमवर्गीयांचे वीज बिल माफ करावे अशी सूचनावजा मागणी केली आहे. त्यांचीच सूचना स्वीकारून महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब व मध्यमवर्गीयांचे 300 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशी आग्रहाची मागणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे..

मी यापूर्वीही 300 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे. कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीमुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. ती कुटुंबे वीज बिल भरण्याच्या स्थितीत नाहीत हे मुख्यमंत्री ठाकरे व ऊर्जामंत्री राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे. सुमारे अडीच महिन्यापूर्वीच मी ही मागणी केली होती शासनाने अजूनपर्यंत या मागणीवर विचार केलेला नाही.

प्रियंका गांधी यांनी केलेली वीज बिल माफीची मागणी आणि त्यांनी केलेल्या सूचना महाराष्ट्र शासनाने स्वीकाराव्या. महाराष्ट्रात सध्या काँग्रेस सत्तेवर आहे आणि ऊर्जा खातेही काँग्रेसच्या कार्यक्षम मंत्र्यांकडेच आहे. त्यामुळे ही मागणी मान्य करणे कठीण नाही, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले आहे.

राज्यावर महामारीसारखे संकट आले असताना वेळप्रसंगी जनतेला दिलासा देणारे निर्णय घ्यावे लागतात, हे लक्षात घेऊनच माझी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मागणी करावी, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.