Published On : Wed, May 20th, 2020

श्रमिक एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या जेवणाची मनपातर्फे व्यवस्था

स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत १८ हजार प्रवाशांना अन्न वितरण

नागपूर : मागील दोन महिन्यांपासून हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत अशा अवस्थेत मिळेल त्या मार्गाने मजूर घराची वाट पकडत आहेत. या मजुरांसाठी केंद्र शासनाने श्रमिक एक्सप्रेस या विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. या विशेष रेल्वेगाड्यांनी या सर्व मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविले जात आहे. या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना एक किंवा दोन दिवसाचा प्रवास करून घर गाठावे लागणार आहे. अन्न पाण्याविना हा प्रवास होउ नये. यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. परराज्यात जाणा-या प्रत्येक प्रवाशाला जेवणाचे साहित्य देत मनपातर्फे निरोप दिला जात आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या नेतृत्वात आतापर्यंत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सुमारे १८ हजार प्रवाशांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्याने शहराच्या जवळच्या भागातील अनेक मजूर स्वगृही जाण्यासाठी नागपुरात पोहोचत आहेत. शहरात दाखल होणा-या या मजुरांच्या व्यवस्थेसाठी नागपूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस प्रशासन समन्वयाने कार्य करीत आहे. या मजुरांची नोंद करून त्यांची प्रवासाची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये ठेवणे, तिथे त्यांना आवश्यक साहित्य पुरविणे, रेल्वे तिकीट निश्चित झाल्यास त्यांना मनपाच्या आपली बसने रेल्वे स्थानकांपर्यंत सोडणे, तिथे त्यांना तिकीटचे वितरण करणे ही संपूर्ण प्रक्रिया सर्व विभागांच्या समन्वयाने पार पाडली जात आहे.

रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी या सर्व प्रवाशांना चार पोळ्या, तीन पराठे, दोन बिस्कीट पॉकीट, केळी, लोणचे, पाण्याची बॉटल अशा सर्व साहित्याची किट प्रत्येक प्रवाशाला देण्यात येत आहे. एका रेल्वे गाडीमधून सुमारे १५०० मजुर प्रवास करतात या सर्वांच्याच जेवणाची व्यवस्था मनपातर्फे केली जाते. मनपा शहरातील विविध सेवाभावी नागरिक आणि संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे १८ हजार प्रवाशांना जेवणाच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

विविध संस्थांकडून दररोजच्या जेवणाच्या साहित्याची जबाबदारी स्वीकारली जाते. तर अन्न वितरण कार्यामध्ये मॉ नागपूर ग्रुप ऑफ फ्रेंन्डस् व असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉइजचे पदाधिकारी व स्वयंसेवक सहकार्य करीत आहेत.