Published On : Sat, Jun 22nd, 2019

‘अब की बार 220 के पार’; देवेंद्र फडणवीस रथयात्रा काढणार

मुंबई : काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी रथयात्रा काढत असत. यामुळे लोकांपर्यंत पोहोचता येत होते. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीस राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये रथयात्रा काढणार आहेत.

विधानसभेच्या 288 जागांवर पुढील काही महिन्यांत निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निकडणुकीत भाजपा, शिवसेनेच्या युतीने सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीची हवाच काढली होती. हे वातावरण विधानसभेपर्यंत तसेच ठेवण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारचा आहे. शेतकरी कर्जमाफी, दुष्काळी उपाययोजना आणि मदत, जलसिंचन प्रकल्प, शेततळी, विहीरी आदींचे काम यामध्ये मांडले जाणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीला फडणवीस सरकार लागले असून मुख्यमंत्री कोणाच्या होणार या वादात न पडता एकत्र काम करण्याचे आवाहन शिवसेनेच्या वर्धापनदिनावेळी मुख्यमंत्र्यांनी केले होते. या दृष्टीने पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये फडणवीस रथयात्रा काढणार असून सर्वच्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये फिरणार आहेत. तसेच या प्रचारावेळी ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार 220 के पार’, अशा घोषणा दिल्या जाणार आहेत.