
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या भागात दुष्काळ संहितेतील ‘ट्रिगर-१’नुसार मदत आणि सवलती लागू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली.
दुष्काळी भागातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारे छायाचित्र आणि जीपीएस लोकेशन नोंदवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, तर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यासोबतच पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे.
कृषीपंपांच्या वीजबिलातही सवलत देण्यात येणार आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांचे बिल आधीच माफ असून, त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांनाही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय मनरेगाच्या माध्यमातून रोजगाराची कामे वाढवणे, शेतकरी व शेतमजुरांना धान्यपुरवठा, गरजेनुसार टँकरने पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था आणि जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत.




