नागपूर : महाराष्ट्र पोलीस महासंचालक (डीजीपी) कार्यालयाने राज्यभरातील पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल करत १५० पोलीस निरीक्षकांच्या (पीआय) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या यादीत नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश असून, या बदल्यांमुळे शहरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये नेतृत्व बदलणार आहे.
आदेशानुसार, बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश अहेर यांची बदली नाशिक शहरात करण्यात आली आहे. तर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांची पुणे शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय विजय चव्हाण यांची डायल-११२, नागपूर येथे, प्रशांत पोतदार यांची जालना, सुरेश डांबरे यांची वर्धा, तर नितीन पतंगे यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूर पोलीस आयुक्तालयातही नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, अमरावती शहरचे महेंद्र आंभोरे, अमरावती ग्रामीणचे अजित राठोड तसेच नक्षलविरोधी अभियानात कार्यरत भावना धुमाळे यांची नागपूर शहरात बदली करण्यात आली आहे.
तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) कार्यरत महेश कोंडावार यांची नागपूर ग्रामीण पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यभरातील या व्यापक बदली प्रक्रियेनंतर संबंधित अधिकारी लवकरच नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार असून, या बदल्यांमुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





