Published On : Wed, Feb 19th, 2020

महाराजांच्या संकल्पनेतील कल्याणकारी राज्य साकारुया : आयुक्त तुकाराम मुंढे

छत्रपती शिवाजी महाराजांना मनपा केंद्रीय कार्यालयात अभिवादन

नागपूर, : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने आपलीभूमिका समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रशासकीय सुधारणा लक्षात घेऊन वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य पार पाडावे. शहरातील प्रत्येक नागरिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी आपल्या दायित्वाची जाणीव ठेवून नियमाच्या चौकटीत राहून जनहिताच्या दृष्टीने व कार्यक्षमतेने काम करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका केंद्रीय कार्यालयात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, शहराच्या विकासासाठी प्रशासकीय सुधारणा व आर्थिक शिस्त लावण्यात येत असून त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय कामात पारदर्शकता व सुसूत्रता आणावी. यासाठी प्रत्येकाने त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्या आणि कर्तव्यात कुठलीही कसूर करु नये, असे सांगितले.


अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, शहरातील २७ लाख नागरिकांचे तारणहार तुम्ही आहात. तुमचे काम असे असायला हवे की नागरिकांना तुमच्यावर गर्व असायला हवा. वारंवार त्याच चुका होणे अपेक्षित नाही. यापुढे ते चालणारही नाही. प्रत्येक कर्मचारी हा आपल्या क्षेत्रापुरता आयुक्त आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपले काम दाखविण्याची संधी आहे. केवळ स्वत:पुरता विचार करू नका. कार्यालयामध्ये स्वच्छता ठेवा. स्वत:च्या सवयी बदला. आरोप-प्रत्यारोपाचा गेम बंद करा. हे शहर माझे आहे. त्याच्याप्रति माझे दायित्व आहे. त्यासाठी मीच जबाबदार आहे, हे ओळखा आणि नागपूर महानगरपालिकेची ‘टीम’ म्हणून कार्य करा, असा सल्ला त्यांनी दिला.

यावेयी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, निर्भय जैन, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, उपसंचालक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, महादेव मेश्राम, अमीन अख्तर, मनोज गणवीर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.