नागपूर : कामठी तहसीलमधील घोरपड गावातील शेतात मध्य प्रदेशातून सागवान लाकडाची पुष्पा स्टाईलने तस्करी करून ते लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या तस्करांविरुद्ध धाडसी कारवाई केली आहे.
या शेतातून पोलिसांनी लाखो रुपये किमतीचे २३ सागवान लाकूड जप्त केले. या कारवाईनंतर नागपूरमधील सागवान व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
नागपुरात तस्करी केलेले सागवान खरेदी करणारे व्यापाऱ्यांसह दलालही भूमिगत झाल्याची चर्चा आहे. मध्य प्रदेशातील सागवान वृक्षांचे तस्कर जंगले नष्ट करत असतानाही वन अधिकारी आणि पोलिस उदासीन कसे आहेत, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
तस्करी केलेला माल मध्य प्रदेशची सीमा ओलांडून महाराष्ट्रातील नागपूरला कसा पोहोचला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.या तस्करीत नागपूरमधील कोणी व्यक्ती सहभागी आहे की नाही याचाही तपास पोलीस करत आहेत.