Published On : Sat, Aug 31st, 2019

एम.एस.एम.ई. विकास संस्थेतर्फे नागपूरात स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाचे 1 सप्टेंबर रोजी आयोजन

केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग व जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे हस्ते होणार उद्‌घाटन

नागपूर: केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूर व स्वयंम्‌ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 1 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान वर्धमान नगरस्थित परंपरा लॉन येथे सुशिक्षित बेरोजगारांना एम.एस.एम.ई. च्या योजनाविषयी जागृत करण्यासाठी स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाचे उद्‌घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे तर विशेष अ‍तिथींच्या स्थानी ग्रीनक्रूड व बायोफ्युएल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती एम.एस.एम.ई. विकास संस्था नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार यांनी रवी भवन येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी बोलतांना दिली.

केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे राबविल्या जाणा-या योजनासंदर्भात मार्गदर्शन करुन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरीत करणे हे या अभियानाचे मुळ उद्दिष्ट आहे. सदर अभियानाप्रसंगी लघू उद्योगाच्या संयत्रांची प्रारुपे मांडल्या जाणार असून जिल्हा उद्योग केंद्र , खादी ग्रामीण औद्योगिक महामंडळ व महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था (एमगिरी) वर्धा यांच्यातर्फे आर्थिक योजना व उपक्रमासंदर्भात तरुणांना माहिती दिली जाणार आहे.

हा कार्यक्रम संपुर्णपणे नि:शुल्क असून नागपूर तसेच विदर्भातील तरुणांनी बहुसंख्येने आपला सक्रीय सहभाग नोंदवण्याचे आवाह्न श्री. पार्लेवार यांनी केले आहे.