Published On : Sat, Aug 31st, 2019

पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे दृष्टीने गणेश मुर्ती विसर्जनाची व्यवस्था करावी

आमदार सुधाकर कोहळे व आरोग्य समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी घेतला आढावा

नागपूर: दक्षिण नागपूरला सक्करदरा तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्याचे दृष्टीने याठिकाणी गणपती मूर्तींचे विसर्जन सक्करदरा तलावात न करता कृत्रिम तलावात होईल यादृष्टीने योग्य ती व्यवस्था करावी. तसेच तलावासमोरील ऐतिहासिक लक्ष्मीनारायण मंदीरासमोर आवश्यक आकर्षक रोषणाई करावी, म.न.पा.चे स्वच्छ भारत ‍ अभियानासह विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी L.C.D. स्क्रीन सक्करदरा, गांधीसागर व तेलंगखेडी/ फुटाळा तलावाचे ठिकाणी करावी. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावात पिण्याचा पाण्याचा वापर न करता तलावाचे किंवा विहीरीचे पाण्याच्या वापर करावा, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती विरेंद्र कुकरेजा व दक्षिण नागपूरचे आमदार श्री. सुधाकर कोहळे यांनी दिले.

दक्षिण नागपूरातील स्वयंसेवी संस्थाचे सहकार्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशमुर्ती विसर्जन व्यवस्था व जनजागृती करण्यासाठी करावयाचे व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दक्षिण नागपूरचे अंतर्गत हनुमाननगर व नेहरुनगर झोनची बैठक आज म.न.पा.च्या डॉ.पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती श्री.विरेन्द्र कुकरेजा व दक्षिण नागपूरचे आमदार श्री.सुधाकर कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत केली होती.

आमदार श्री.कोहळे यांनी तलावाचे जवळ १० निर्माल्य कलशाची व्यवस्था करावी, तलावाचे तिन्ही बाजूला स्टेज, पेंडॉलमध्ये व बाहेर पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी. पी.ओ.पी. मुर्तीचेबाबत जनजागृती करावी, गणेश विसर्जन दीड दिवसांनी होणार असल्याने त्यापूर्वी कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था करावी. तलावासमोर बॅरिकेटींग सजविण्यात यावे, तसेच स्वच्छ भारत, स्वच्छ पर्यावरण, पाणी वाचवा, ओला कचरा-सुका कचरा विलगीकरण संकलन व रेन वॉटर हार्वेस्टींग, सक्करदरा तलाव सौंदर्यीकरण, ई-लायब्ररी, छोटे ताजबाग इ. ची माहिती त्याठिकाणी देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

स्वयंसेवी संस्थातर्फे देखील प्रा.ईश्वर धिरडे, चंद्रकांत रागीट व नयना झाडे यांनी यावेळी उपयुक्त सूचना केल्या. बैठकीला आमदार सुधाकर कोहळे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांचेसह स्थापत्य समिती सभापती श्री.अभय गोटेकर, माजी स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे, हनुमाननगर झोनचे सहा.आयुक्त राजु भिवगडे, नेहरुनगर झोनच्या सहा.आयुक्त स्नेहा करपे, आरोग्याधिकारी डॉ.सुनील कांबळे, कार्य. अभियंता अमीन अख्तर, झोनल अधिकारी (आरोग्य) डी.एम.कलोडे, रामटेके, कनिष्ठ अभियंता श्यामसुंदर ढगे, नरेश शिंगण जूडे, प्रा.ईश्वर धिरडे, प्रा.विनोद कडू, सुर्वोदय इंजि.कॉलेजचे प्रा.चंद्रकांत रागिट, अव्दैत फाऊंडेशनचे शुभम जगताप, कूमार इटनकर, माजी नगरसेविका व क्लिन फाऊंडेशच्या नयना झाडे,, अर्चना एकुंचलवार, प्रतीक्षा बलवीर, शुभांगी चिंतलवार, जय हिवरकर आदी उपस्थित होते.