Published On : Mon, Mar 9th, 2020

बांबूच्या कलाकुसरीच्या वस्तू विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी एम. एस. एम. ई. विकास संस्थान सहकार्य करेल – एम. एस. एम. ई.

Advertisement

नागपूर : गडचिरोली तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये बांबूचे उत्पादन जास्त असल्यामुळे यावर आधारित बांबूचे शिल्प व कलाकुसरीच्या वस्तू विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एम. एस. एम. ई.) विकास संस्था, नागपूर आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन एम. एस. एम. ई. विकास संस्था नागपूर चे संचालक डॉ. पी.एम. पार्लेवार यांनी आज नागपुरात दिले.

सेमीनरी हिल्स येथील केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्त हस्तशिल्प त्यांच्या अधीन असणाऱ्या हस्तशिल्प सेवा केंद्र नागपूर द्वारे बांबू कारागिरांना उन्नत अवजार (टूल किटचे) वितरण कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता , त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी हस्तशिल्प सेवा केंद्राचे वरिष्ठ सहाय्यक संचालक एस. आर. मसराम, प्रादेशिक श्रम आयुक्त तरुणकुमार सिंग, पत्र सूचना कार्यालय नागपूरचे सहाय्यक संचालक शशिन राय, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचे टेकाम प्रामुख्याने उपस्थित होते.

बांबू आर्टिशन कलाकृती घडवण्यासाठी जुनी अवजारे वापरात असल्याने आता त्यांना उन्नत आणि सक्षम टूलकिट मिळाल्याने त्यांना हे काम करणे सुविधाजनक ठरेल. बांबूकाम करणाऱ्या कारागिरांचा क्लस्टर जर एम. एस. एम. ई. च्या योजनांसोबत जोडला गेला तर एक चांगला उपक्रम घडवता येईल असं पार्लेवार यांनी सांगितलं . नागपूरात आयोजित केल्या जाणा-या खासदार औद्योगिक महोत्सवांमध्ये बांबू वर आधारित एका कार्यशाळेचे सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे ,या कार्यशाळेत बांबू कारागिरांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केलं.

हस्तशिल्प सेवा केंद्राचे वरिष्ठ सहाय्यक संचालक एस आर मसराम यांनी आर्टिशन्सना जे टूलकिटस्‌ वितरीत करण्यात आल्या त्याचा सदुपयोग करुन आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी असे आवाहन केलं.

या कार्यक्रमाला नागपूर व वर्धाच्या भागातून आलेले बांबू कारागीर उपस्थित होते. कार्यक्रमाच सुत्रसंचालन हस्तशिल्प सेवा केंद्राचे हस्तशिल्प विकास अधिकारी सुरेश तांडेकर यांनी केलं. लाभार्थी शिल्पकारांच्या वतीने करुण मसराम, वर्धा यानी हस्तशिल्प सेवा केंद्र, नागपुर चे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस. डी. आंबेकर यांनी केले. या कार्यक्रमाला यशश्वी करण्यासाठी कार्यालयाचे पुरारी, अमित, नरेश बिंद यांचे सहकार्य लाभले.