Published On : Fri, Jun 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या हाकेला धामणगाव मधील युवकांनी साथ दिल्याने टळली जीवितहानी

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव येथील जनजीवन झाले सुरळीत
Advertisement

नागपूर : शेतात बेजबाबदारपणे तणकट व पालापाचोळ्याला लावलेली आग काही मिनीटात संपूर्ण गावाला आपल्या विळख्यात कशी घेऊ शकते याचा प्रत्यय 2 मेच्या रात्री धामणगाव वासियांनी घेतला. नागपूर पासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील या अचानक उद्भवलेल्या आगीच्या संकटाने गावकऱ्यांसह संपूर्ण प्रशासनाची परीक्षा घेतली. एका घरा पाठोपाठ तब्बल 50 पेक्षा अधिक घरे आणि जनावराचे गोठे काही मिनीटात आगीत होरपळले. घटनेची खबर मिळताच भिवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हसकर आपल्या 15 शिपायांसह गावात पोहचले. गावातील युवाशक्ती आणि पोलीसांनी क्षणात निर्णय घेऊन अगोदर अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. प्रशासन व गावकरी यांच्या एकीतून येवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागूनही मनुष्यहानीचे गालबोट लागू शकले नाही.

2 मे रोजी सायंकाळच्या सुमाराला नागपूर जिल्ह्यात काही भागात वादळ वारा सुरु झाला. गावाशेजारी असलेल्या शेतातील तणकट, पालापाचोळा गोळा करुन एका शेतकऱ्याने त्याला आग लावली. पाहता पाहता ही आग वादळ वाऱ्याने गावात पसरली. अवघ्या काही मिनीटात 400 उबंरठे असलेल्या धामणगावची 16 घरे व 34 गोठे-झोपड्या या आगीच्या भक्षस्थानी पडली. सायंकाळची वेळ असल्याने काही गोठ्यांमध्ये गाई तर काही गोठ्यामध्ये बकऱ्या बांधलेल्या होत्या. अचानक लागलेल्या या आगीने सारे गाव खडबडून एक झाले. वेळेवर पोहचलेले पोलीस, महसूल विभागातील कर्मचारी आणि गावकऱ्यांनी एकमेकांच्या धैर्यातून संपूर्ण गावाला जीवीतहानीपासून रोखण्यात यश मिळविले.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘मी दिवसभराची कामे आटोपून सायंकाळी 6.45 ला भिवापूर पोलीस स्टेशन येथेच हजर होतो. वादळ सुरु झाले होते तेवढ्यात आग लागल्याची घटना कानावर आली. वातावरण व हवेचा वेध लक्षात घेता त्वरीत मी व शिपाई असे पंधरा जण मिळून धामणगावकडे कुच केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोनवर संपर्क साधून आम्हाला दिशा दिली. रस्त्यात वादळाने काही ठिकाणी झाडेही पडली होती. येथून जवळ असलेल्या भिसी नगर पंचायतला कल्पना देऊन त्यांच्याकडून व नंतर भिवापूर, उमरेड येथून पाण्याचे अग्नीशमन दलाच्या पथकांना बोलावून घेतले. भीतीने व्याकुळ झालेल्या गावकऱ्यांना धीर देताच सारे गाव व गावातील युवाशक्ती आम्ही एक झाल्याने आगीत अडकलेल्या लोकांना सुखरुप काढण्यावर भर दिला व त्यात आम्हाला यश मिळाले’ असे भिवापूर पोलीस स्टेशन‍मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र म्हसकर यांनी सांगितले.

राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व स्थानिक पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून सर्व प्रकारची मदत तत्काळ धामणगावला पोहचविण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आगीची व्याप्ती लक्षात घेऊन गावकऱ्यांसह जनावरांनाही दुसऱ्या दिवशी सकाळी आवश्यकत्या बाबी पोहचविण्यावर भर दिला. पशु वैद्यकीय विभागाने आगीतून वाचलेल्या जनावरांवर तत्काळ उपचाराचा कॅम्प सुरु केला. किराणा साहित्यापासून इतर मदत पोहचविण्याचे नियोजन केले.

Advertisement

महसूल विभागाकडून शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात सोळा घरे पुर्णत: क्षतीग्रस्त, नऊ अंशत: आणि चौतीस पुर्णत: नष्ट झालेल्या गोठे/ झोपडयांचा समावेश आहे. श्री. महालक्ष्मी संस्थान कोराडी यांचेकडून सर्व बाधित कुटूंबांना 20.00 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर सर्व बाधित कुटूंबांना 75 किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले. पशु वैद्यकीय विभागाकडून बाधीत असलेल्या 25 पशु पालकांना चारा उपलब्ध करुन दिला आहे. गावामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा दररोज पुरवठा सुरु असून समाज मंदिर येथे आरोग्य शिबीर लावण्यात येत आहे. शासनाकडून 25 संसार उपयोगी भांडयाचे किट आणि किमान 15 दिवस पुरेल असे किराणा किटचे वाटप आमदार डॉ. संजय मेश्राम यांच्याहस्ते करण्यात आले.

आधारकार्ड, राशनकार्ड, निवडणूक कार्ड इतर विविध प्रकारचे दाखले जर आगीत नष्ट झाले असतील तर अशा व्यक्तींसाठी दोन दिवसात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज वैद्यकीय पथकांमार्फत नागरीकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. या आकस्मिक आगीमध्ये एकूण 9 इलेक्ट्रीक मिटर जळाले होते. यापैकी 5 मिटर महापरिवर्तन कंपनीने बसवून दिले. जिल्हा खनिकर्म निधीतून आपतग्रस्त कुटुंबाना घर बांधणी साठी अनुदान देण्याबाबत कार्यवाही सुरु केली आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीमधून अधिकाधिक मदत व्हावी यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.