नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शनिवारी नागपुरात एक ऐतिहासिक पाऊल उचलले. संघाच्या दैनंदिन ‘प्रार्थना’चे लंडनमधील जागतिक ख्यातीच्या रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राकडून संगीतबद्ध विशेष ध्वनिमुद्रण सार्वजनिक करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन डॉ. रेशमबाग येथील हेडगेवार स्मृती भवनात करण्यात आले होते. या प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत, संगीतकार राहुल रानाडे, आयोजक हरीश मिमानी तसेच इंद्रनील चितले (चितले इंडस्ट्रीज) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ब्रिटिश कलाकारांकडून भारतमातेचे स्वर-
संगीतकार राहुल रानाडे यांनी या उपक्रमामागील प्रेरणा स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “संघाची प्रार्थना भारतमातेवर आधारित आहे. 1939 मध्ये जेव्हा ही रचना झाली तेव्हा भारत ब्रिटिश सत्तेखाली होता. आज 85 वर्षांनंतर ब्रिटिश कलाकारांनी भारतमातेचे वाद्य गाणे ही ऐतिहासिक न्यायाची जाणीव करून देणारी गोष्ट आहे.”
या ध्वनिमुद्रिकेत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह इतर कलाकारांनीही स्वर दिले आहेत. रानाडे यांनी या प्रकल्पासाठी सरसंघचालक भागवत यांची विशेष परवानगी घेतल्याचे सांगितले.
प्रार्थनेची ताकद समाजाला जोडणारी –
या प्रसंगी मोहन भागवत यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “संघात प्रार्थना करताना प्रत्येकाची आवाजातली ताकद वेगळी असते, पण सर्वजण मनापासून म्हणतात. ही प्रार्थना एकत्र उच्चारली की ती थेट हृदयाला भिडते.”
भागवत यांनी आशा व्यक्त केली की या नव्या ध्वनिमुद्रिकेमुळे समाजाला संघाशी जोडले जाईल. “संघाच्या प्रार्थना केवळ शाखेतच नव्हे तर विविध माध्यमांतूनही पुढे नेल्या जात आहेत, हे स्वागतार्ह आहे,” असे ते म्हणाले.
प्रार्थनेची वैशिष्ट्ये-
संघाची ही प्रार्थना ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमि…’ अशा शब्दांनी सुरू होते आणि शेवटी ‘भारत माता की जय’ या घोषणेसह समाप्त होते. यात सर्वप्रथम भारतमातेचा आणि त्यानंतर ईश्वराचा गौरव केला जातो. विशेष म्हणजे, प्रार्थनेत भारतमातेकडे काही मागितले जात नाही, तर त्या स्वतः देतील तेच स्वीकारले जाते.
1939 पासून आजवर दररोज स्वयंसेवक शाखेत ही प्रार्थना म्हणत आले आहेत. सरसंघचालकांच्या मते, या सातत्यपूर्ण साधनेमुळे प्रार्थनेला मंत्रासारखी शक्ती प्राप्त झाली आहे.