मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. महापालिका, नगरपरिषद आणि इतर स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारीचा धडाका सुरू केला आहे. मात्र, निवडणुका नेमक्या कधी होणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे. दिवाळीनंतर निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.
काही निवडणुका जानेवारीत होऊ शकतात –
एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी निवडणुकांवर भाष्य केले. ते म्हणाले, “काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मात्र, याबाबत माझ्याकडे ठोस माहिती नाही.” यावेळी त्यांनी, “आता पुन्हा उद्या म्हणतील की मीच निवडणुका जानेवारीत होतील असं सांगितलं, पण प्रत्यक्षात याची जबाबदारी माझ्याकडे नाही,” असेही स्पष्ट केले.
निवडणुका इतक्या का लांबल्या?
अजित पवार म्हणाले, “निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. 2017 नंतर 2022 साली या निवडणुका होणे अपेक्षित होते. पण 2022, 2023, 2024 अशी तीन वर्षे निघून गेली आणि आता 2025 देखील संपत आलं आहे. निवडणुका पुढे ढकलल्या जाण्यामागे काही कारणे आहेत, पण त्याच्या खोलात मी जाणार नाही.
तथापि, सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून निवडणूक प्रक्रिया उशीराने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुढे काय?
अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरंच जानेवारीत गेल्या तर कोणकोणत्या महापालिका व संस्थांचा त्यात समावेश असेल? हा मोठा प्रश्न आता पुढे आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.