Published On : Sun, Nov 24th, 2019

पशुधन विकास व शेती व्यवसाय एकमेकांना पूरक

केंद्रीय पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य विकास मंत्री गिरिराज सिंह यांचे प्रतिपादन

नागपूर : पशुसंवर्धन आणि शेती व्यवसाय हे एकमेकांना पूरक असून दुधाळ जनावरांइतकेच भेकड जनावरेसुद्धा उपयुक्त असून त्याच्या शेण व मलमूत्राचा वापर शेतकऱ्यांनी रासायनिक खत म्हणून केल्यास शेतीवरील रासायनिक खतांचा भार कमी होईल व कृषी उत्पादनातसुद्धा वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य विकास मंत्री गिरिराज सिंह यांनी आज नागपुरात केले. 11 व्या ॲग्रोविजन या कृषी प्रदर्शनी निमित्त कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘विदर्भात दुग्ध उत्पादनाचा विकास व दुग्ध प्रक्रियेतील संधी’ या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचे (एनडीडीबी) अध्यक्ष दिलीप रथ, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते..

केवळ शेती आधारित व्यवसायामुळे एखाद्याला वर्षात 100 दिवस रोजगार मिळत असेल तर तोच रोजगार पशुपालन व्यवसायामुळे वर्षातील 300 दिवस सुद्धा मिळण्याची शक्यता असते असे गिरिराज सिंह यांनी पशुधनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले. कुक्कुट पालन, बकरी पालन यातून होणाऱ्या मल व विष्ठेचे कंपोस्ट करून त्याच्या सेंद्रीय खताची निर्मिती करण्याकरिता शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तरुण पिढीने कृषी संशोधन तसेच पशुसंवर्धन विकास यासंदर्भातील शिक्षण अभ्यासक्रमाकडे वळावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

एनडीडीबीने विदर्भातील शेतकऱ्यांकडून दूध संकलनामध्ये नवे विक्रम प्रस्थापित केले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दूधसंकलनाची रक्कम थेट पोहोचत असल्याचे एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी यावेळी सांगितले. मार्च महिन्यापर्यंत दुध संकलनासाठी 3 हजार गावामध्ये दहा हजार शेतकऱ्यांना जोडणार असून दूध संकलनाचे लक्ष साडेतीन लाख लिटर प्रति दिवस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एनडीडीबी मार्फत प्रगतिशील शेतकऱ्यांच्या ‘मायक्रो ट्रेनिंग सेंटर’ ची स्थापना करण्याचा निर्णय झाला असून या सेंटर्स मार्फत चारा उत्पादन, पशुपालन यासंदर्भातील शास्त्रशुद्ध ज्ञान शेतकऱ्यांना देण्यात येईल. असे सहा सेंटर तीन जिल्ह्यात स्थापन करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. हायब्रीड नेपियर, मोरिंगा, मका या चारा सदृश्य पशुखाद्याच्या वापरासाठी शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेला राज्यातील विविध भागांतून आलेले पशुपालक व दुग्ध व्यवसायातील संस्था ,राज्य व केंद्र शासनाच्या दुग्धविकास व पशुसंवर्धन विभागात विभागाचे अधिकारी उपस्थित होते.