Published On : Tue, Apr 7th, 2020

जीवनावश्यक वस्तुंचा नागरिकांना सुरळीत पुरवठा व्हावा

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निर्देश : व्यावसायिक संघटनांची बैठक

नागपूर : ‘कोराना’च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान नागरिकांची फरफट होता कामा नये. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी व्यापारी संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा. काळाबाजार होता कामा नये. तसे लक्षात आल्यास व्यापारी संघटनांनीच अशा व्यापाऱ्यांवर स्वत:हून कारवाई करावी, असे आवाहन करीत प्रशासनातर्फेही अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, त्यात कुठलाही खंड पडू नये, घरपोच सेवेला प्राधान्य मिळावे, यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोरोनाचे संकट देशावर आले आहे. नागपुरातही त्याची व्याप्ती आहे. त्यामुळे पुढील कालावधी विचारात घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांवर आहे. या काळात नागरिकांची पिळवणूक होता कामा नये. यावर आता व्यापाऱ्यांनीच अंकुश आणायला हवा व सामाजिक बांधिलकी जपावी.

व्यापाऱ्यांना जर वितरण , उत्पादन आणि वाहतूकसंदर्भात काही अडचणी असेल तर त्या प्रशासनाला नक्की सांगाव्या. ऑनलाईन लिंक देऊन घरपोच सेवा देता येईल का, याचा व्यापाऱ्यांनी अवश्य विचार करावा. नागरिकांना भाजीबाजारात जायची गरज पडू नये, अशी व्यवस्था मनपाने केली. घरपोच किंवा घरासमोर भाजीपाला नागरिकांना मिळतो आहे, त्यादृष्टीने अन्य व्यापाऱ्यांनीही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

व्यापारी प्रतिनिधींनीही आपली भूमिका यावेळी मांडली. सध्या मागणी कमी आहे. परंतु पुढील काही महिने पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. फक्त सध्या बाजारात कमी प्रतीचा गहू उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीचा गहू मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये आहे. वाहतूक नियमित झाल्यास तेथून तो गहू उपलब्ध होऊ शकेल. व्यापारी त्यांच्या सेवा देत आहेत. माल आला तरी ते उतरविण्यासाठी मजूर मिळत नाही, अशा अडचणी त्यांनी मांडल्या.

यावर बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला प्रतिबंध नाही. चांगला गहू जेथून मागवायचा आहे तेथून मागवा. काही अडचण आली तर तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यावर मार्ग काढण्यात येईल. व्यापाऱ्यांनी व्यापार करताना स्वत:चेही आरोग्य जपावे व इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी वाहतूक परवानगीसंदर्भात माहिती दिली. प्रादेशिक परिवहन कायारलयात २४ बाय ७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. ०७१२-२५६१६९८ असा तेथील क्रमांक आहे. यासोबतच ८१०८६८३९१९ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. वाहनाची पास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करता येईल. त्यासाठी mh31@mahatranscom.in यावर अथवा https://transport.maharashtra.gov.in या वेबलिंकवर जाऊन अर्ज करता येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी दिली.

बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं.भा. पवार, प्रभारी सह आयुक्त (औषधे) प्र. ना. शेंडे, प्रभारी सहायक आयुक्त अभय देशपांडे, सहायक कामगार आयुक्त एन.पी. मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रशांत नेरकर, होलसेल ग्रेन ॲण्ड सीडस्‌ मर्चंट असोशिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे राजेंद्र कावडकर,वीरभान केवलरामानी, महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे श्रीकांत दुबे, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे ज्ञानेश्वर रक्षक, नागपूर कन्फेक्शनरी बेकरी व नमकीन असोशिएनशचे प्रदीप धमकानी, बेकरी असोशिएशनचे विजय ग्वालानी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.