Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 7th, 2020

  सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची वेळ

  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे : मेडिकलच्या माजी विद्यार्थ्यांनी दिले एक हजार बुट


  नागपूर : सध्या देशावर आलेले कोरोनाचे संकट म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे. अशा परिस्थितीत समाजातील सर्वच घटकांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची वेळ आहे. सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्या योद्ध्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने, बाटा कंपनीने आणि व्यकंटेश केमिकल्सने दिलेले योगदान मोठे आहे. यासाठी त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे, या शब्दात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  बाटा कंपनीने सीएसआर फंडातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून एक हजार बूट आणि व्यंकटेश केमिकल्सच्या वतीने ५०० लिटर सॅनिटायझर्स नागपूर महानगरपालिकेला देण्यात आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ते स्वीकारले. याप्रसंगी ते बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. उदय नार्लावार, डॉ. चंद्रकांत बोकाडे, डॉ. सुधीर नेरळ, व्यंकटेश केमिकल्सचे के.के. गुप्ता, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. प्रवीण गंटावार यांची यावेळी उपस्थिती होती.

  याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दानदात्यांचे आभार मानले. अशा मदतीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्यांचे मनोबल वाढते. एकत्रित येऊन कार्य केल्याने नक्कीच कोरोनावर विजय प्राप्त करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नैसर्गिक नियम पाळले तर भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवणार नाही. अशी परिस्थिती आली की नेहमी मेयो आणि मेडिकलवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे यापुढे मनपाची आरोग्य यंत्रणा सक्षम आणि सशक्त बनविण्याचा आपला मानस आहे. भविष्यात २०० ते ३०० खाटांचे सर्व सुविधांनी युक्त मनपाचे रुग्णालय तयार करण्याचे प्रस्तावित असून यातही समाजाची साथ हवी, असे ते म्हणाले.

  बाटा कंपनीने सीएसआर फंडातून पुरविलेले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून देण्यात येणारे बुट डॉ. सुधीर नेरळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तर व्यकंटेश केमिकल्सतर्फे पुरविण्यात आलेले सॅनिटायझर के.के. गुप्ता यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविले. भविष्यात आणखी काही वस्तू देण्याचा मानस डॉ. नेरळ यांनी व्यक्त केला. मनपाला देण्यात आलेल बुट हे स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर्स तसेच फिल्ड वर्कर्सला पुरविण्यात येणार आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145