Published On : Mon, Jun 27th, 2022

तंत्रज्ञानाला स्वदेशीची जोड देण्याची गरज : ना. गडकरी

Advertisement

योगानंद काळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर: आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता त्याला स्वदेशी आणि स्वावलंबनाची जोड देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने स्वदेशी जागरण मंचाने चिंतन करावे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ.भा. संयोजक व नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु योगानंद काळे यांच्या ‘स्वदेशी एक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन ना. गडकरी यांच्या हस्ते ना. गडकरी यांच्या निवासस्थानी झाले. कार्यक्रमाला डॉ. विनायक देशपांडे, संयोजक शिरीष तारे, प्राचार्य योगानंद काळे, धनंजय भिडे, सुधीर दिवे उपस्थित होते. याप्रसंगी योगानंद काळे यांच्या हस्ते ना. गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.

या पुस्तकाचे प्रकाशन करताना ना. गडकरी याप्रसंगी पुढे म्हणाले- भारतीय संस्कृती आणि इतिहास हा भारतीय विचारदारेशी संबंधित आहे. स्वदेशी विचारांना तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. विदेशी तंत्रज्ञानाला विरोध न करता ते आपल्याकडे कसे विकसित होईल आणि त्याला स्वदेशी व स्वावलंबनाची जोड कशी देता येईल, यादृष्टीने विचार करावा. कृषी क्षेत्रात स्वदेशीचा प्रचार मंचाने करावा, असे आवाहन ना. गडकरी यांनी केले.

आज इथेनॉलवर चालणारे जनरेटर आले आहे. वाहने इथेनॉलवर चालवली जात आहे. इलेक्ट्रिक बस बाजारात आल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचे पंप हद्दपार करून त्याजागी इथेनॉलचे व इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन निर्माण करायचे आहे.

येणार्‍या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी निर्माण केली तर भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- योगानंद काळे यांनी विदर्भाचा विकास, देशाची आर्थिक धोरणे यावर लेखन केले. स्वदेशीचा विचारही त्यांनी स्पष्टपणे मांडला.

यावेळी योगानंद काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुस्तकात स्वदेशीची संकल्पना मांडली आहे. त्याच्या विक्रीतून प्राप्त होणारी रक्कम स्वदेशी विचार मंचला देण्यात येईल, असेही योगानंद काळे म्हणाले. प्रकाशक चंद्रकांत लाखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तर संचालन अजय पत्की यांनी केले.