Published On : Wed, Mar 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लाईनमन’ हा शब्द नाही, तर जिद्दीचे प्रतीक; नागपूरच्या दिपाली खोब्रागडे यांचा दिल्लीत होणार राष्ट्रीय गौरव

Advertisement

नागपूर: आज ‘राष्ट्रीय लाईनमन दिना’चे औचित्य साधत महावितरणच्या नागपूर विभागातून एक अत्यंत प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. महाल विभागामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या दिपाली खोब्रागडे यांची 7 मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या चार कर्मचाऱ्यांमध्ये दिपाली खोब्रागडे या एकमेव महिला आहेत. त्यांच्या या यशाने महावितरणचा मान उंचावला असून, ही कामगिरी संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आज नागपूर परिमंडल कार्यालयातर्फे काटोल रोडस्थित ‘विद्युत भवन’ येथे सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते दिपाली यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता अमित परांजपे व संजय वाकडे, कार्यकारी अभियंता महेश चतुर्वेदी, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांच्यासह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

आपल्या गौरव सोहळ्याला उत्तर देताना दिपाली खोब्रागडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “लाईनमन हे केवळ एक पद आहे, ते लिंगावर आधारित नाही. लाईन हेल्परपासून मुख्य अभियंत्यापर्यंत प्रत्येक कर्मचारी हा महावितरणचा एक ‘लाईनमन’च आहे. मला सुरुवातीपासूनच काहीतरी आव्हानात्मक करण्याची ओढ होती. सुरक्षिततेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी हीच माझी खरी शक्ती आहे. जोखमीचे काम हाती घेण्यापूर्वी काही क्षण केलेली मानसिक तयारी मला अधिक आत्मविश्वास देते.” कुटुंबाची साथ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ग्राहकांकडून मिळणारा आदर हा भीतीचे सावट दूर करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, ग्राहकांनी वीज सुरक्षिततेबाबत अधिक साक्षर राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, तरुणांना जिद्दीने या क्षेत्रात येण्याचे आवाहन त्यांनी केले.

Gold Rate
Mar 2nd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,67,000/-
Gold 22 KT ₹ 1,55,300/-
Silver/Kg ₹ 2,87,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिपाली खोब्रागडे यांच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. हा गौरव केवळ नागपूर परिमंडळाचा नसून संपूर्ण महावितरणचा असल्याचे सांगत त्यांनी दिपाली यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement