Published On : Fri, May 18th, 2018

Video: कर्नाटकाप्रमाणे गोवा आणि मणिपूरलाही सारखा न्याय द्या – उद्धव ठाकरे

Advertisement

मुंबई : कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ज्याप्रमाणे कायद्याचा वापर करून न्याय लावण्यात आला, तसाच न्याय गोवा आणि मणिपूरमध्ये का लावण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आजच्या सामानातील अग्रलेखात भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि जेडीएसकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ असताना राज्यपालांनी १०४ जागा असणाऱ्या भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आजचा सामना संपादकीय….

‘कर्नाटकातील विधानसभा त्रिशंकू आहे व भारतीय जनता पक्षाला १०४ जागा मिळूनही ते लटकत राहिले. काँग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली व त्यांनी स्वीकारली. दोघांचे मिळून ११६ आमदार झाले व त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला, पण राज्यपालांनी १०४ संख्याबळ असलेल्या भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. गोवा आणि मणिपूरमध्ये एक न्याय व कर्नाटकात दुसरा न्याय हे पुन्हा दिसले. नियम व कायदा दुसऱ्यांसाठी आणि स्वतः मात्र हव्या त्या बेबंद मार्गाने सत्ता मिळवायची व टिकवायची हेच नवे धोरण उदयास आले आहे. साधनशूचिता व नीतिमत्तेची अपेक्षा काँग्रेसकडून करता येत नव्हती म्हणून लोकांनी भारतीय जनता पक्षाला खांद्यावर घेऊन नाचवले, पण त्यांचेही पाय मातीचेच निघाले,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपावरनिशाणा साधला आहे.

११६ आमदार असणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला डावलून बहुमत गाठिशी नसणाऱ्या भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. ‘राज्यपाल भारतीय जनता पक्षाचे नम्र सेवक आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात मंत्रिमंडळात राज्यपाल वजुभाईंनी १४ वर्षे काम केले आहे व मोदी यांच्या कृपेनेच ते कर्नाटकच्या राज्यपालपदी बसले आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले हे बरोबर आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी ‘काँग्रेस-जेडीएस’ आघाडीचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी बोलावले असते तर आश्चर्य वाटले असते, पण आमच्या न्यायपालिकांपासून राज्यपालांपर्यंत कोणीच आंधळ्या न्यायदेवतेच्या तत्त्वास जागत नाहीत. त्यामुळेच ११६ आमदारांच्या सह्या असल्याचा दावा ठोकरून १०४ वाल्यांसाठी पायघडय़ा घातल्या जातात. हे सर्व काँग्रेस राजवटीत घडले असते तर ती लोकशाहीची हत्या ठरली असती व राज्यपाल हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे कळसूत्री बाहुले ठरले असते, पण आता राज्यपाल भाजप विचारांचे असल्याने त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही व ते लोकशाही मूल्यांना धरून वागले हे मान्य केले पाहिजे’, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.